आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News In Marathi, Uttar Pradesh, Maharashtra, Lok Sabha Election

बिहारमध्ये राजकीय प्रेमाचा त्रिकोण;यूपी, महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक 40 जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमध्ये राजकीय प्रेमाचा त्रिकोण झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव काँग्रेससोबत युती करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. पण काँग्रेस सध्या कलंकित लालूंपेक्षा सत्ताधारी जनता दल युनायटेडच्या प्रेमात पडली आहे, तर विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे रुसलेले नितीशकुमार डाव्या पक्षांसोबत आघाडी करून मोकळे झाले आहेत.उद्या बुधवारी लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राजकीय प्रेमाच्या या त्रिकोणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.


उत्तर प्रदेश (80 ) महाराष्ट्र (48 ) खालोखाल 40 जागा असलेला बिहार हे लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठे व महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे बिहारमधील बदलती राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरत आहेत. भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांना संरक्षण देणारा वटहुकूम राहुल यांनी पुढाकार घेऊन रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे लालू यादव चारा घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाऊन आल्यामुळे राजदशी युती करण्यास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उत्सुक नाहीत. गेल्या निवडणुकीत राजद आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची आघाडी होती. यंदा पासवानही लालूंची साथ सोडून गेले आहेत. तर एकटे पडलेले लालू आता कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी युती करण्यासाठी उतावीळ झाली आहेत. मात्र काँग्रेसकडून त्यांना काडीमात्र प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिहारला विशेष राज्याचा दर्जा देऊन नितीशकुमार यांना खुश करून त्यांच्याशी घरोबा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. तर नितीशकुमार यांनी माकप आणि भाकपशी आघाडी करून काँग्रेसला तिष्ठत ठेवले आहे.


2009 लोकसभा निवडणूक बिहारमधील विद्यमान स्थिती
एकूण जागा 40
0 जनता दल युनायटेड - 20
0 भारतीय जनता पार्टी - 12
0 राष्ट्रीय जनता दल - 04
0 काँग्रेस - 02 0 अपक्ष - 02


जुने शत्रू झाले मित्र
2009 मध्ये जदयू आणि भाजप रालोआचे घटक पक्ष या नात्याने एकत्र निवडणूक लढले होते. मात्र, त्या वेळी लालूंनी पासवान यांच्या लोजपशी युती करून कॉँग्रेसला काडीमात्र किंमत दिली नव्हती. जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर कॉँग्रेसने त्या वेळी स्वबळावर निवडणूक लढवली होती. आता अगदी उलट स्थिती झाली असून जुने शत्रू आता मित्र झाले आहेत. पासवान भाजपसोबत आहेत, तर जदयू आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही. लालू एकटे पडले आहेत आणि जदयू सोबत आघाडी करण्यास उत्सुक असलेल्या कॉँग्रेसच्या मागे धावत आहेत.


काँग्रेससोबत घरोबा नाही : नितीश
बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तरीही काँग्रेससोबत घरोबा करणार नाही, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसोबत युती करणार का, असा थेट प्रश्न विचारल्यानंतर ‘सवाल ही पैदा नहीं होता ’अशा शब्दांत त्यांनी उडवून लावले. काँग्रेससोबत युती करण्याचा सुरुवातीपासूनच प्रस्ताव नव्हता. निर्थक चर्चा आणि निव्वळ वावड्या फैलावल्या आहेत, असे नितीश म्हणाले. काँग्रेस आणि राजद हे नेहमीचेच यशस्वी मित्रपक्ष आहेत. आता त्यांच्यातील बोलणीत कुठपर्यंत प्रगती झाली, हा त्यांचा प्रश्न आहे. जदयूने आगामी निवडणुकीसाठी माकप आणि भाकपशी युती केली आहे. भाकपशी जागावाटपाची बोलणी झाली आहेत. माकपशी सुरूआहेत, असे नितीश यांनी सांगितले.

काँग्रेसला अधिक जागा सोडण्याची तयारी : लालू
काँग्रेससोबत अद्याप जागावाटप झालेले नाही. मात्र त्यांच्यासाठी अधिक जागा सोडण्याची तयारी असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. काँग्रेस-राजद जागावाटपाची बोलणी झाल्याचे वृत्त मी वाहिन्यांवरच पाहिले. या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा आहे. भाजप सर्मथक वाहिन्यांवरून अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप लालूंनी केला. काँग्रेसला 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा देण्याचे लालूंनी रविवारी जाहीर केले होते. परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.