फोटो : एका कार्यक्रमात चर्चा करताना केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह आणि बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी.
पटना - काळाबाजारी आणि काळ्या पैशाच्या मुद्यावर बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मांझी म्हणाले, व्यापारी मुलांच्या शिक्षणासाठी काळाबाजारी करत असले, तर त्याचे आभार मानायला हवे. तर कृषीमंत्री नरेंद्र सिंह म्हणाले, काळा पैसा पांढरा करायची संधी मिळायला हवी, कारण आपल्या सगळ्यांकडेच 5-10 लाख रुपये ब्लॅक मनी असते. त्यात लज्जास्पद काही नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दोन-चार हजार कोटींचा काळाबाजार करणा-यांच्या विरोधात कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भारत सरकारने परदेशात जमा असणारा काळा पैसा आणावा आणि गुंतवणूक करावी. आम्ही सरकारला सहकार्य करू, असे ते म्हणाले. माजी खासदार स्व. रामलखन प्रसात गुप्त यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित अन्नधान्य पुरवठा
व्यापा-यांच्या राज्य स्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह हेही उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, व्यापा-यांचा विकास झाला तरच बिहारचा विकास होईल. छोट्या व्यापा-यांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात लहान मोठ्या घटना घडत आहेत. पण सर्व वरिष्ठ अधिका-यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती आणखी सुधारेल. व्यापा-यांच्या सर्व समस्यांचा तोडगा काढू. बिहारला विशेष राज्याचा दर्जा ही दया नसून आमचा अधिकार आहे. केंद्राला विशेष दर्जा बहाल करण्याची अॅलर्जी असेल तर असू द्या, असेही मांझी म्हणाले.
कृषीमंत्र्यांची भलतीच मागणी !
बिहारचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह म्हणाले की, मोरारजी देसाई सरकारने 1977 मध्ये अशी व्यवस्था लागू केली होती की, एखाद्या व्यक्तीने कर भरला तर त्याला पैसा कोठून आला हे विचारले जात नव्हते. तीच व्यवस्था पुन्हा लागू केली तर, कर चोरीचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.