आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Asked 5 Questions To Mamta Banerjee After Malda Incedent

हिंसाचाराचे तथ्य शोधण्यासाठी माल्दाला गेलेल्या भाजप पथकास परत पाठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या माल्दा येथील हिंसाचारावरून राज्यात आगामी विधानसभेआधी राजकारण तापले आहे. हिंसाचाराशी संबंधित तथ्य शोधण्यासाठी गेलेल्या भाजपच्या तीन खासदारांच्या पथकास जिल्हा प्रशासनाने सकाळी माल्दा स्थानकावर अडवले. त्यांना बळजबरीने कोलकात्याच्या रेल्वेत बसविले.
यावर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शाब्दीक चकमक उडाली आहे. भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर व्होटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोप ठेवला. त्याच्या उत्तरात पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेसने म्हटले की, भाजप निवडणुकीआधी १०० दिवस जातीय हिंसाचार भडकवण्याच्या प्रयत्नात आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले, तीन खासदारांमध्ये एस.एस.अहलुवालिया, भूपेंद्र यादव आणि रामविलास वेदांती यांना माल्दा येथे पाठवण्यात आले होते. अहलुवालिया म्हणाले, आम्ही वास्तव जाणण्यासाठी आलो होतो, चौकशीसाठी नव्हे. मात्र, राज्य सरकारच्या दबावात जिल्हा प्रशासनाने आम्हाला रोखले. त्यासाठी जमावबंदी आदेशाचे कारण देण्यात आले. भाजप नेते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिल्लीत सांगितले की, पक्षाचे नेते गृहमंत्र्यांशी चर्चा करतील. घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय पथक स्थापन्याची मागणी करणार आहोत. या मुद्द्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली जाईल.

भाजपचे ममतांना पाच प्रश्न
१. गोंधळाआधी जातीय तणाव वाढवणारी पत्रके का वाटण्यात आली?
२. ममता बॅनर्जी म्हणाल्या, माल्दाची घटना उत्तर प्रदेशातून आलेल्या(कमलेश तिवारी) वक्तव्यावर प्रतिक्रिया होती. मात्र, प्रतिक्रिया त्वरीत असते, ३० दिवसानंतर नव्हे. ही पूर्वनियोजिक कृती होती.
३. ममता यांनी पुन्हा विधान बदलले. त्यांनी म्हटले की, स्थानिक बीएसएफ सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. मात्र, एक लाख लोकांनी पोलिस ठाणे का जाळले?
४. एनआयए माल्दामध्ये बनावट नोटांचे रॅकेट पकडणार होती. देशात ८० टक्के बनावट नोटा माल्दातून येतात. सर्व दस्तऐवज कालियाचक पोलिस ठाण्यात होती. तेच जाळून नष्ट करण्यात आले.
५. माल्दामध्ये अफूची शेती आहे. अफू बांगलादेशात पाठवला जातो. त्याला का अटकाव घातला जात नाही?
भाजप चिथावणीच्या प्रयत्नात : ओब्रायन
तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले, कालियाचक, माल्दा येथील स्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे. तिथे कोणाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वत:ची रणनीती आहे. त्यांना हा मुद्दा जातीयवादी करावयाचा आहे. टि्वटरवर हॅशटॅग्ज चालवले जात आहे. वर्षभरापूर्वीचे जुने छायाचित्र शेअर केले जात आहे. सोशल मीडियावर बेजबाबदार टि्वट केले जात आहे. भाजप राज्यातील निवडणुकीआधी १०० दिवस जातीय तणाव पसरवू इच्छित आहे. त्यांनी हीच पद्धत अन्य निवडणुकीच्या राज्यातही अवलंबली आहे. मात्र, इथे त्यांची स्थिती बिहारपेक्षाही वाईट होईल.