आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Backs Vishwa Hindu Parishad \'s 84 kosi Parikrama Yatra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजवादी पार्टी-संघ परिवार 24 वर्षांनंतर आमने-सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या / फैजाबाद- 84 कोसी परिक्रमेवरून अयोध्या व फैजाबादमध्ये शनिवारी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यात्रा काढणारच, असा निर्धार विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केल्याने सरकार हादरले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करताना संघटनेचे 300 कार्यकर्ते, नेत्यांना प्रशासनाकडून अटक करण्यात आली आहे.

उद्या रविवारी शरयूच्या तीरावर पूजा करून परिक्रमेस सुरुवात होणार आहे. सन 1989 नंतर 24 वर्षांनी समाजवादी पार्टीचे सरकार व संघ परिवारातील संघटना पुन्हा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत.

अयोध्या व फैजाबादमधील सुरक्षेतही शनिवारी प्रचंड वाढ करण्यात आली. राज्यातील समाजवादी पार्टीच्या अखिलेश सरकारने यात्रेवर बंदी घातल्यानंतर तणावाला सुरुवात झाली. बंदी जाहीर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी अयोध्येत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या यात्रेवर बंदी घालण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु विहिंपने ही परंपरा असल्याचे सांगून शनिवारी त्यावर निर्धार व्यक्त केला. त्याचदरम्यान महंत संतोष दास तथा साधूबाबा यांना कोठडीत डांबले. वाराणसीच्या विहिंप कार्यालयात बाबा आपले कार्य करतात. त्याशिवाय विहिंपचे महंत राम सरन दास यांना राम सानेही घाट येथे ताब्यात घेण्यात आले. विहिंपच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने शेजारी राज्यांचीदेखील मदत मागवली आहे.

परिक्रमा 13 सप्टेंबरपर्यंत : विहिंपने 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत 84 कोस परिक्रमा यात्रेचे आयोजन केले आहे. शरयू नदीच्या किनाºयावर पूजा केल्यानंतर उद्या रविवारी परिक्रमेस सुरुवात होईल. ही यात्रा राज्यातील सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यात फैजाबाद, बस्ती, बाराबंकी, गोंडा, बहरीच, आंबेडकरनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तणाव आणखी वाढण्याची भीती
परिक्रमा यात्रेला मनाई करण्यात आलेली असताना रविवारी ही यात्रा निघणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रविवारी सहा जिल्ह्यांत सुरक्षा दलाचे 2 हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेत किमान 40 ते 50 हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज आहे.

यात्रा मूलभूत अधिकार : सुषमा स्वराज
विहिंपच्या यात्रेला सरकारने परवानगी दिली पाहिजे. नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे. यात्रेमुळे परिसरात कसलाही तणाव निर्माण झालेला नाही. केवळ काही बेताल वक्तव्यांमुळे तसे चित्र असेल. परंतु लोकांनी अशा प्रकारची वक्तव्ये टाळली तर यात्रा शांततामय वातावरणात पार पडू शकेल, असे स्वराज म्हणाल्या.

राजकीय कार्यक्रम नाही
यात्रा हा काही राजकीय कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. यात्रेवरील बंदी हटवावी.’’
प्रवीण तोगडिया, विहिंप नेते

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
काही लोक यात्रेच्या माध्यमातून धार्मिक सामंजस्य नष्ट करू पाहत आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा हा एक कट आहे.’’
अखिलेश यादव, मुख्यमंत्री.

सिंघल, तोगडिया यांच्याविरुद्ध वॉरंट : अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, राम विलास वेदांती यांच्याविरुद्ध फैजाबाद जिल्हा दंडाधिकारी विपिनकुमार द्विवेदी यांनी वॉरंट बजावले आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपास मोहीम राबवली जात आहे. कारसेवकपुरम, मणिराम छावणी, रामजन्मभूमी ट्रस्ट अध्यक्ष, महंत नृत्यगोपाल दास आणि अर्धा डझन संशयितांचा अयोध्या परिसरात कसून शोध घेण्यात येत आहे. अगोदर विहिंपच्या प्रसिद्ध 70 नेत्यांवर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.