आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडीपीने लवकर निर्णय घ्यावा, भाजप सरचिटणीस राम माधव यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसंबंधी असलेली अनिश्चितता संपावी असे आम्हाला वाटते. भाजपने त्यासाठी कोणतीही अट घातलेली नाही. केवळ पीडीपीने आता लवकर निर्णय घ्यायला हवा, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सोमवारी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

दोन्ही पक्षांत लवकरच समन्वय होऊन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न व्हायला हवेत. भाजप बिनशर्त पीडीपीसोबत आहे, असे सांगून माधव यांनी सरकार स्थापनेच्या निर्णय पीडीपीच्या कोर्टात टोलवला. मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी सर्वात अगोदर भाजपने पहिल्यांदा संवाद साधला होता. त्याचबरोबर स्थापनेसाठी आवश्यक जागा वाटपावर चर्चा करण्याची मागणीही आम्ही केली होती. परंतु त्या अगोदर दोन्ही पक्षांतील चर्चा सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. राज्यातील आताची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत चर्चा झालेली नाही, अशा बातम्या येत असल्या तरी त्यात काहीही तथ्य नाही, असे माधव यांनी स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या अनिश्चिततेवरील पडदा कधी उठेल, या प्रश्नावर ते म्हणाले, त्याचे उत्तर तुम्हाला पीडीपीकडून मिळू शकेल.

त्यांनी पक्षांतर्गत प्रक्रिया पूर्ण करायला हवी. आम्ही बोललो आहोत. आता त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी त्यांच्या नेत्याची निवड करावी आणि या मुद्द्यावर पुढे यायला हवे. ते लवकरच निर्णय घेतील, अशी मला अाशा आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासाचे मोठे व्हिजन
दिवंगत मुख्यमंत्री सईद यांच्या पीडीपी आणि भाजपने राज्यात काही महिन्यांपूर्वी सरकार स्थापन केले होते. त्याचा उद्देश राज्याचा विकास करणे असा आहे. आघाडीकडे राज्याच्या विकासाचे मोठे व्हिजन आहे. आघाडीचे सरकार हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळेच हे आघाडी सरकार कायम राहावे, असा आमचा प्रयत्न आहे, असे माधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नव्या समीकरणाची चर्चा
पीडीपीसोबत भाजपची पुन्हा आघाडी करण्यासाठी माधव यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. वास्तविक भाजपसोबत आघाडी केल्यापासूनच पीडीपीमधील एक गट कायम नाराज होता. या गटाने आता पुन्हा एकदा उसळी मारण्यास सुरुवात केली आहे. या गटाने सध्याच्या बदलेल्या वातावरणाचा फायदा घेऊ नये, म्हणून माधव यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय सईद यांच्या निधनानंतर रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मेहबूबा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे राम माधव आघाडीसाठी अधिक सक्रिय झाले आहेत.

प्रशासनाच्या कामाचे मेहबुबा यांच्याकडून कौतुक
श्रीनगर । दिवंगत मुफ्ती मोहंमद सईद यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामाबद्दल पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासनाचे कौतूक केले आहे. सुशासनासाठी प्रशासनाने दाखवलेल्या समर्पण भावनेबद्दल मुफ्ती यांनी नोकरशहांची स्तुती केली आहे. सईद यांच्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नोकरशहा प्रामाणिकपणे झटले. त्यामुळे काही प्रमाणात उद्दिष्टपूर्ती होऊ शकली, असे त्यांनी एका पत्रकाद्वारे नमूद केले.

राज्यपालांच्या सचिवांना सूचना
जनतेच्या कामात कोठेही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. त्याचबरोबर सरकारी सेवा-सुविधांही सुरळीत ठेवण्यात याव्यात, अशी सूचना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी राज्यातील सर्व सचिवांना दिल्या आहेत. व्होरा यांनी सोमवारी सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेतली. बैठकीपूर्वी दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती माेहंमद सईद यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...