आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल, पदाधिकारी मंत्री बनल्याने रिक्त पदे भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पाच वरिष्ठ पदाधिकारी गेल्या आठवड्यात मोदी सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्री बनले आहेत. त्यामुळे रिक्त झालेली संघटनात्मक पदे भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नव्या टीम सहका-यांची घोषणा करू शकतात.
पक्षाचे तीन राष्ट्रीय सरचिटणीस जे. पी. नड्डा, राजीवप्रताप रुडी, रामशंकर कठेरिया व दोन उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी, बंडारू दत्तात्रय हे मंत्री बनले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मंत्री बनलेले पीयूष गोयल हे अद्याप कोशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जागीही पक्षाने कुणाला घेतलेले नाही. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हे सूत्र प्रभावी आहे. त्यामुळे ज्यांना मंत्रिपदे मिळाली आहेत त्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करून त्या ठिकाणी नव्या पदाधिका-यांना पुढे आणले जाणार आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाने नुकत्याच दोन विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. पक्षाचा विस्तार आणि वाढता आकार लक्षात घेता पक्षाला एका पूर्णवेळ कोशाध्यक्षाची गरज आहे. मोदी व शहांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल झालेला नाही. तो लवकरच केला जाऊ शकतो.
जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याचे उद्दिष्ट
भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष व्हावा ही अध्यक्ष अिमत शहांची इच्छा आहे. या वेळी नऊ कोटी सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सध्या ८.५ कोटी सदस्यांची चिनी कम्युनिस्ट पार्टी जगात सर्वाधिक सदस्य असणारी पार्टी आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षाने व्यापक सदस्यता अभियान सुरू केले आहे. त्यावर मुख्यालयातून एका टीमद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. सदस्यता माेहिमेला गती येण्यासाठी िरक्त पदे लवकर भरली जाणार आहेत.