वाराणसी - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि कानपूरचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनी केंद्र सरकारला 'घरचा आहेर' दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा स्वच्छता अभियानाला निरर्थक म्हणत खासदार जोशींनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या गंगेच्या पात्रात नौका चालवण्याच्या योजनेला अव्यवहारी ठरविले आहे. वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमात जोशी म्हणाले, 'केंद्र सरकार तुकड्या-तुकड्यात गंगेची स्वच्छता करणार आहे. असे झाले तर पुढील 50 वर्षांमध्येही स्वच्छता होणार नाही.'
मोदी - जोशी मतभेद पुन्हा उघड
खासदार जोशी म्हमाले, 'मोदींनी गंगा स्वच्छता अभियानाचे निरर्थक प्रयोग सुरु केले आहेत. गंगेची विभागून विभागून स्वच्छता करण्याची त्यांची (मोदींची) योजना आहे. असे झाले तर पुढील पन्नास वर्षांमध्येही गंगा स्वच्छ होणार नाही. ' जोशींनी गंगेच्या स्वच्छेतेसोबतच इतरही नंद्यांच्या स्वच्छतेची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, 'गंगेबद्दल सर्वच तार स्वरात सध्या बोलत आहेत, पण कावेरी आणि सिंधू नदी बद्दल कोणीच बोलायला तयार नाही.' केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी गंगेतून नौका प्रवास सुरु करण्याची योजना आखील आहे. त्याला विरोध करताना ती योजना अव्यवहारी असल्याचे जोशींनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी मतदार संघ स्वतःसाठी घेतला आणि मुरली मनोहर जोशींना कानपूर येथून तिकीट दिली होते. तेव्हा जोशींनी त्याचा कडाडून विरोध केला होता. त्यांच्या मनातील ती सल अद्यापही तशीच असल्याचे समोर आले. जोशी म्हणाले, 'मी माझा प्रवास तिथून सुरु केला होता, जिथे सर्वात स्वच्छ जल आहे. मात्र आज मला तिथे नेऊन ठेवले आजे जिथे गंगेचे सर्वाधिक प्रदूषण झाले आहे. मला वाराणसीहून कानपूरला पाठवण्यात आले.' आता राजकारणातही प्रदुषण वाढले आहे. पूर्वी सर्वकाही शुद्ध होते, असा टोलाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.