आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजमा हेपतुल्ला म्हणाल्या - टोपीवाल्यांकडूनच मुस्लिम समाजाला टोपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - देशातील बहुतांश मुस्लिम समाजाला आज भाकरीची गरज आहे. मात्र, आजपर्यंत टोपीवाल्यांनी मुस्लिमांची दिशाभूल करून टोपीच घातली, अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली. आता नरेंद्र मोदी सरकार या लोकांच्या भाकरीची सोय करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. मुस्लिमांमध्ये कौशल्य गुण विकसित व्हावेत म्हणून केंद्राने उस्ताद, मानष आणि मंजिल यांसारख्या योजना सुरू केल्या असल्याची माहिती हेपतुल्ला यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी जी अाश्वासने देण्यात आली ती सरकारने पहिल्या वर्षभरातच पूर्ण केली असल्याचा दावाही त्यांनी केला. शनिवारी विश्रामगृहावर पत्रकारांनी हेपतुल्ला यांना नरेंद्र मोदी टोपी घालत नसल्याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. गरिबांना इफ्तार देणे आज गरजेचे आहे.
इफ्तार पार्टीमध्ये लोक फक्त फोटो काढून घेण्यासाठी जातात. अापण स्वत:ही कधी अशा इफ्तार पार्टीत जात नसल्याचे हेपतुल्ला म्हणाल्या. यापेक्षा गरीब वस्त्यांमध्ये आपण अन्नदान करत असल्याचे त्यांनी सांगितले. सच्चर आयोगाचा दाखला देऊन हेपतुल्ला म्हणाल्या, या आयोगाच्या अहवालात मुस्लिमांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बिहारमध्ये तर ही स्थिती अतिशय बिकट असल्याचेही त्या म्हणाल्या.

सुषमा स्वराज यांची पाठराखण
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणात काहीही चूक केलेली नाही, असे हेपतुल्ला म्हणाल्या. मोदींना व्हीसा दिल्याने काही दोन्ही देशांतील संबंधांवर वाईट परिणाम होणार नाही, असे त्यांनी नमूद केले.