आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या भूलथापांना कुणी बळी पडू नका, व्यंकय्या नायडुंचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - काँग्रेसचा धोरणीपणा त्याला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षांना समजत नाही. या पक्षांनी काँग्रेस नीती समजून घ्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास आणि संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. या भूलथापांना बळी न पडण्याचा सल्लाही त्यांनी इतर राजकीय पक्षांना दिला.

विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस बोलत नाही, असा अारोप व्यंकय्यांनी केला. ५० वर्षे राज्य करून देशाला रसातळाला नेणाऱ्या काँग्रेसला भाजपचे केंद्रातील यश पाहवत नाही. भाजपच्या विकासकामात यथाशक्ती अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून अनेक विधेयकांना राज्यसभेत रोखून धरण्याचे तंत्र काँग्रेसने अवलंबले आहे, असा आरोप व्यंकय्या यांनी केला. भाजपचा अपप्रचार करणे हाच काँग्रेसचा सध्या अजेंडा असल्याचे ते पत्रपरिषदेत बोलताना म्हणाले.

सहकारी तत्त्वावर भर
मोदी सरकार सहकार क्षेत्राचा विकास व टीम इंडिया संकल्पनेवर आधारित विकास करण्यावर भर देत आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. आर्थिक घोटाळे, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशात निरुत्साह आहे. गेल्या एक वर्षात जनतेचा आत्मविश्वास व उत्साह वाढविण्यावर भाजप सरकारने भर दिला आहे. रुपयाची खालावलेली स्थिती सुधारणे व गुंतवणूक वाढवण्यासाठी वर्षभरात अनेक प्रयत्न झाल्याचे नायडू म्हणाले. यासाठीच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. देशात रोजगाराच्या संधीत व परदेशी गुंतवणूकीत वाढ होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

ऊर्जा विकासाला प्राथमिकता
देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हे सर्वात महत्वाचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सरकार तंत्रज्ञानाचा स्विकार करत आहे. डिजिटल इंडियाचे तेच उद्दीष्ट्य आहे.

संसदीय कामकाजात सुधारणा
वर्षभरात संसदीय कामकाज जास्त शिस्तीने होत असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले. संसदेला अधिकाधिक शक्तीशाली करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून संसदेत विकासाचे राजकारण घडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसकडून सामान्य जनतेची दिशाभूल : नायडू
लोकांची दिशाभूल करून काँग्रेस भूमी अधिग्रहण विधेयक मोठे संकट असल्याचे भासवत आहे. आेडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने (बीजेडी) व इतर पक्षांनीही भाजपला सहकार्य करून विकासकामे पुढे न्यावीत, असे आवाहन व्यंकय्या यांनी केले. काँग्रेस अपरिपक्व व बेजबाबदार विरोधी पक्ष अाहे. यूपीएच्या कार्यकाळात २ लाख एकर सार्वजनिक मालकीची जमीन खासगी क्षेत्राला दिली गेली. आता मात्र एक इंचही जमिनीचे बेकायदा हस्तांतरण होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...