आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - मुजफ्फरनगर दंगलीत सातत्याने दबाव वाढल्यानंतर शुक्रवारी अटकेची पहिली कारवाई करण्यात आली. भाजपचे आमदार सुरेश राणा यांना अटक झाली. विधानसभेतील कामकाज आटोपून घरी परतत असताना राणा यांना लखनऊमधील आंबेडकरनगर उद्यानाजवळ अटक करण्यात आली. एसटीएफचे अधिकारी त्यांना अज्ञात स्थळी घेऊन गेले आहेत. पोलिसांकडून त्यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. राणांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. राणा शामली जिल्ह्यातील थाना भवन मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपचे आमदार सुरेश राणा, हुकूमसिंह, भारतेंदू सिंह यांच्यासह अन्य 16 जणांवर दंगल भडकवण्याचा आरोप आहे. राणा यांना प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल अटक करण्यात आली.
राणा यांना अटक करण्याची कारवाई केवळ सूडभावनेतून करण्यात आली आहे, असा आरोप भाजपचे आमदार हुकूमसिंह यांनी केला आहे. महापंचायतीमध्ये बसपा, सपा, काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते; परंतु त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. सपा सरकार पक्षपातीपणा करू लागले आहे, असे हुकूमसिंह म्हणाले. भाजपच्या आरोपाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर दिले असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ठणकावले आहे.
फोन करणार्यांचे काय ?
विधानसभेत बोलू न दिल्याबद्दल संतप्त झालेल्या भाजपचे आमदार उपेंद्र तिवारी यांनी सभागृहात सरकारला चांगलेच उघडे पाडले. मुजफ्फरनगर दंगलीत आपल्या गटाच्या लोकांच्या सुटकेसाठी पोलिसांना फोन करणार्यांना वेगळा न्याय का, असा सवाल तिवारी यांनी केला. त्यांचा रोख सपा नेते आझम खान यांच्याकडे होता.
अखिलेश यांच्याकडून माफी
परस्परविरोधी घोषणाबाजीमुळे सभागृहात वादंगाचे चित्र निर्माण झाले. जे झाले त्याबद्दल आपण माफी मागतो. माझ्या मंत्र्याची चूक झाली. वादग्रस्त संभाषणाला कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री यादव यांनी वादावर पडदा टाकला.
वादंगाचे मूळ
कवाल गावात जमावबंदी लागू असतानाही सभा घेतल्याचा ठपका ठेवून भाजपच्या दोन आमदारांवर अटक वॉरंट काढण्यात आले आहे. हेच विधानसभेतील वादंगाचे मूळ ठरले. भाजपशिवाय काँग्रेस, बसपा, भारतीय किसान पार्टीसह एकूण सात आमदारांविरुद्ध वॉरंट निघाले आहे. कवाल गावात तीन तरुणांची हत्या झाली होती. त्यानंतर जमावबंदी लागू झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.