दावानगेरे- राहुल गांधींच्या कर्नाटक दौ-यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राज्यातील दावानगेरे येथे प्रचारसभेला संबोधित केले. भाजपमध्ये नुकतेच स्वगृही परतलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना मोदींनी व्यासपीठावर त्यांच्या शेजारीच बसविले. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडवी लागलेल्या येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत मोदींनी भ्रष्टाचारावर बोलणे टाळले. मोदी यांनी महागाई, वंशवाद, तेलंगणा व काँग्रेसमुक्तीचा नारा देताना मात्र भ्रष्टाचाराबाबत चकार शब्दही काढला नाही.
महिला सुरक्षाबाबत बोलले मोदी- मोदींनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले की, ते येथे येतात आणि महिलाच्या सुरक्षितेतची गोष्टी बोलतात. मात्र यांच्या सरकारने दिल्लीला रेप कॅपिटल बनविले आहे. रविवारी राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसमध्ये महिलांना कसलेही स्थान नसल्याची टीका केली होती.
मोदी पुढे म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेसकडे कोणतीही योजना नाही. काँग्रेसने सांगावे, की राजस्थानमधील त्यांचे किती मंत्री तुरुंगात गेले व का गेले? राजस्थानमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री बाबूलाल नागर आणि महिपाल मदेरणा लैंगिक शोषण व भंवरी देवीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात आहेत.
तेलगंणा मुद्यांवर बोलताना मोदी म्हणाले, राहुल आणि मॅडम सोनिया यांनी दक्षिण भारतात अनेक ठिकाणी दौरे केले. मात्र आंध्र प्रदेशातील सीमांध्रमध्ये जाण्याची हिंमत केली नाही. या लोकांना सत्ता एवढी प्रिय झाली आहे की सीमांध्र लोकांच्या भावनेची थोडीही कदर नाही. काँग्रेसमुक्तीचा नारा देताना मोदी म्हणाले, काँग्रेसला छोटी-मोठी शिक्षा देऊन काही फरक पडत नाही. आज काँग्रेस पक्ष अहंकारात बुडाला आहे. म्हणूनच मी म्हणतो देशाला वाचवायचे असेल, तरूणांचे भविष्य वाचवायचे असेल तर एक मंत्र स्वीकारावा लागेल. तो मंत्र म्हणजे काँग्रेसमुक्त भारत. काँग्रेसचे बी देशात कोठेही एका कोप-यात राहिले तर त्याला वाढायला वेळ लागत नाही म्हणून काँग्रेसचे तण देशातून उपटून टाका.
राहुल गांधींवर निशाणा- मोदींनी राहुल गांधींवर थेट हल्लाबोल करताना म्हटले की, ते वंशवादात वाढले आहेत तर आम्ही राष्ट्रवादात वाढलो आहोत. तुम्ही विचार करता की सत्ता कशी राखायची तर आम्ही विचार करतो देशाला कसे वाचवायचे. पण आता देश तुमची निती समजला आहे व तुमच्यापासून त्यांना सुटका हवी आहे.
कर्नाटकातील लोकसभेतील जागांचे गणित
लोकसभेच्या एकूण जागा- 28
2009 मध्ये भाजपला 19 जागांवर विजय मिळाला होता
काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या
इतरांना 3 जागा राखता आल्या होत्या.