आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा: मनोहर पर्रीकर आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, बहुमतासाठी १५ दिवसांचा अवधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्यात सत्तेची समीकरणं जुळल्यामुळे मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, मंगळवारी (दि. १४) ते संध्याकाळी ५ वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपने इतर पक्षांच्या व अपक्ष आमदारांशी बोलणी करून सरकार स्थापन करण्यासाठी जुळवणी केल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. पर्रीकर यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. ४० जागा असलेल्या गोवा विधानसभेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. काँग्रेसला सर्वाधिक १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आमदारांची जमवाजमव करण्यात भाजपने आघाडी घेतली. 

पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला २१ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी ३, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला बाजूला ठेवले आहे. गडकरी यांनी रविवारी रात्रीच पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, त्यांना गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि ३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे.
 
काँग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले की, बहुमत मिळविण्यासाठी जे आपल्यासोबत इतर पक्षांना सोबत घेऊ शकले नाही ते आता अपयश लपविण्यासाठी खोटे आरोप करत आहेत. जेव्हा द्राक्ष खायला मिळत नाही तेव्हा ते आंबट लागतात असे म्हणणे सोपे असते, असाही टोमणा त्यांनी काँग्रेसला लगावला. दरम्यान, पर्रीकर यांच्या जागी संरक्षणमंत्री म्हणून कोणावर जबाबदारी सोपविली जाणार ते अद्याप निश्चित झालेले नाही. एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे हे खाते देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

पर्रीकरांसोबत आठ आमदार शपथ घेणार 
मनोहर पर्रीकर यांच्यासोबत जवळपास आठ आमदार मंगळवारी (दि. १४) शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी व अपक्षांतून प्रत्येकी दोन तर भाजपच्या २ ते ३ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. 

जेटलींकडे संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार
मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पर्रीकर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. भाजपने कॅबिनेटमध्ये बदल होणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत. पर्रीकर यांच्या जागी संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी कोणावर टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मणिपूरमध्ये बीरेन सिंह यांची मुख्यमंत्रिपदी निवड 
भाजपने एन. बीरेन सिंह यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या  गटाचा नेता म्हणून एकमताने बीरेन यांची निवड केल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली. बीरेन यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना भेटून सरकार बनविण्याचा दावा सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत ३२ आमदार होते. बीरेन यांनी सध्याचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याशी वाद झाल्यानंतर काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, इबोबी यांनी मंगळवारी राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. 

गोवा, मणिपूरमध्ये भाजपने बहुमत चोरले : चिदंबरम
गोवा आणि मणिपूरमधील नागरिकांनी काँग्रेसला बहुमत देऊनही भाजपकडून ते चोरण्यात येत आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली. गोव्यात भाजपने अपक्षांसह दोन पक्षांना एकत्र करत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. तर, मणिपूरमध्येही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे या दोन्ही राज्यांत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही भाजप सत्तास्थापनेकडे जात आहे. निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा अधिकारच नाही, असेही ते म्हणाले.
 
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री निवड दोन दिवसांत शक्य
उत्तराखंडमधील भाजपच्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आमदारांची बैठक येत्या दोन दिवसांत होणार असून, त्यावेळी मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार आहे. राज्यात सध्या पक्षाकडे चार माजी मुख्यमंत्री या पदासाठी शर्यतीत आहे. कदाचित या सर्वांना वगळून एखादे धक्कादायक नाव पुढे येऊ शकते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी ही माहिती दिली.

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
पंजाब काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री म्हणून राजभवनात १६ मार्च रोजी शपथ घेणार आहेत. त्यानंतर २८ मार्च रोजी सतलज-यमुना लिंक कालव्याच्या करार प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने अमरिंदर यांच्यावर टांगती तलवार आहे. 

सिद्धू बनू शकतात उपमुख्यमंत्री
पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी नवज्याेतसिंग सिद्धू यांची निवड हाेऊ शकते. मनप्रीत बादल यांचीही अर्थमंत्रिपदी वर्णी लागणे निश्चित आहे. सीएलपी नेते चरणजीतसिंह चन्नी, डॉ. राजकुमार वेरका आणि अरुणा चाैधरी यांना दलित चेहऱ्यांच्या रूपाने कॅबिनेटमध्ये सहभागी केले जाणार आहे
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...