आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Seeks More Time From Governor Vohra To Form Govt In J K

जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) भाजपबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्यानंतर भाजपने गुरुवारी सत्ता स्थापनेसाठी आणखी अवधी मागितला आहे. भाजपने जम्मूचाच मुख्यमंत्री हवा या आपल्या भूमिकेवरून काहीशी माघार घेतली आहे. अशा स्थितीत भाजपची बदलती भूमिका विविध पक्षांसोबत होणार्‍या वाटाघाटीमुळे सत्ता स्थापनेतील सस्पेन्स मात्र कायम आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी १९ जानेवारीची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेत घाईने निर्णय घेणार नाही. अन्य पक्षांसोबत चर्चा सुरू असून राज्यातील लोकांना लवकरच चांगली बातमी मिळेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगलकिशोर शर्मा यांनी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. विविध पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यपालांकडे आणखी अवधी मागितल्याचे जुगलकिशोर म्हणाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे.

जम्मूच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप मवाळ
जम्मूविभागाचा मुख्यमंत्री व्हावा या पक्षाच्या मागणीबाबत विचारले असता पक्षाचे राज्य प्रभारी अविनाश राय खन्ना म्हणाले, जम्मू-काश्मीर आणि लडाख मिळून जम्मू-काश्मीर राज्य होते. त्यामुळे मुख्यमंत्री हा जम्मू-काश्मीर राज्याचा होईल. प्रदेश भाजपने अद्यापही जम्मूला मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी जोर लावला आहे. आघाडी सरकारच्या अजेंड्याबाबत खन्ना म्हणाले, यशस्वी आघाडी सरकार कसे चालवायचे हे पक्षाला चांगले माहीत आहे.
भाजपची किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू
सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीत भाजप किमान समान कार्यक्रमावर चर्चा करेल. यानंतर सरकारसाठी संयुक्त कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. आघाडी सरकार कसे चालवायचे हे भाजपला चांगले माहीत असून लोकांचा त्यासाठी आमच्यावर विश्वास आहे. अन्य पक्षांशी चर्चा सुरू आहे. आम्ही स्थिर सरकार देण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे आम्हाला त्याची घाई नाही, असे खन्ना यांनी सांगितले. पक्ष नेतृत्व नॅशनल कॉन्फरन्स की पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी चर्चा करत आहे? या प्रश्नावर राज्यातील पक्षसंख्या माहीत आहे, असे सांगून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
भाजपसोबत जाण्यात गैर नाही
पीडीपीनेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन भाजपसोबत जाण्यात गैर नसल्याचे संकेत दिले हाेते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेल्या मार्गावर सत्ता स्थापन करण्याची मतदारांनी संधी दिली आहे. कोणतेही सरकार आले तरी जनाधाराचा आदर राखला जाईल, असे मेहबूबा यांनी सांगितले.

(फोटो : जम्मू-काश्मीर प्रदेश भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी राजभवनात राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याशी चर्चा केली)