आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP\'s Kirti Azad Calls For Stern Action Over Partys Defeat In Delhi

भाजपवर हल्ला : हरामजादो..च्या वक्तव्याने पराभव : सिरसा, आझाद म्हणाले कारवाई करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर भाजपमध्ये विरोधाचे सूर उमटायला लागले आहेत. दिल्लीतील पराभवासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे बिहारच्या दरभंगा येथील खासदार किर्ती आझाद यांनी म्हटले आहे. पक्षाने दिल्लीत स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असेही आझाद म्हणाले. नकारात्मक प्रचार करणे ही घोडचूक होती, असे मतही त्यांनी मांडले.

सहकाऱ्यांनी आरसा दाखवला
आझाद यांच्याबरोबरच एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या अकाली दल आणि शिवसेनेनेही या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपचा समाचार घेतला आहे. तर अकाली दलाचे मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, भाजपमधील कट्टरपंथी तत्वे आणि किरण बेदींनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवणे ही दोन पराभवाची प्रमुख कारणे ठरली.
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ‘रामजादों और ...जादों’ ही प्रतिक्रिया दिल्याने आणि नंतर डेरा सच्चा सौदाच्या पाठिंब्याने माझा पराभव निश्चित झाला होता, असे सिरसा म्हणाले आहेत. साध्वींनी जी भाषा वापरली ती कोणीही मान्य करणार नाही. माझ्या मतदारसंघातील मुस्लीम मतदार या वक्तव्याने विभागला गेला, असे सिरसा म्हणाले. साध्वी एका प्रचारसभेत म्हणाल्या होत्या की, आपको रामजादों की सरकार चाहिए, या हरामजादों की. दरम्यान, आता मतदारांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे भाजपने समजून घ्यायला हवे असे, पीडीपीचे मुफ्ती मोहंमद सईद यांनी म्हटले आहे.

बेदींच्या नेतृत्वावरही उभे केले प्रश्नचिन्ह
किरण बेदी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित केल्याच्या भाजपच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सिरसा म्हणाले की, किरण बेदींना भाजपने पक्षात आणताच थेट मुख्यमंत्रीपदाची दावेदारी दिली. स्थानिक नेत्यांची मतेही विचारात घेतली नाही. कृष्णा तिरथ यांच्या बाबतीतही तसेच झाले. आता भाजप आणि अकाली दल दोघांनी मिळून आत्मपरिक्षण करायला हवे, असेही ते म्हणाले आहेत.