Home »National »Other State» BJPs Success In Gujarat: Nitish Kumar

गुजरातेत भाजपचे यश निश्चित : नितीश कुमार; पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भूभाग

वृत्तसंस्था | Nov 14, 2017, 03:00 AM IST

  • गुजरातेत भाजपचे यश निश्चित : नितीश कुमार; पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भूभाग
पाटणा-बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीविषयी अंदाज व्यक्त करताना म्हटले की, गुजरातेत भाजप सहज जिंकून येईल. राज्यातील जनतेवर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाचा प्रभाव असून त्यांना हेच नेतृत्व राज्यातही हवे आहे, असे ते म्हणाले. भाजपला कोणी मात देईल अशी स्थिती नाही. आपल्या राज्यातील नेतृत्व केंद्रात असताना त्यांच्या पक्षाला मत न देणे हे जनतेला अयोग्य वाटते, असे आपले निरीक्षण अाहे. राज्यातील लोकभावनेच्या आधारे आपण हा विश्वास व्यक्त केला, असे नितीश बिहारमधील लोकसंवाद कार्यक्रमात बोलताना म्हणाले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातेत आक्रमकरीत्या प्रचार केला. मात्र त्यांच्या प्रचारात कोणताही ठोस अजेंडा नव्हता, असे मत नितीश यांनी मांडले.

संसदीय, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी देशभरात घेण्यात याव्यात, असे आपल्याला वाटते. ही पद्धत योग्य असल्याचे मत नितीशकुमार यांनी मांडले. मात्र नजीकच्या भविष्यात असे होण्याची शक्यता नाही. अनेक राज्यांत पोटनिवडणुका होत असल्याने वेळापत्रक करणे कठीण आहे. यातून घटनात्मक मार्ग काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आेबीसी, एससी, एसटी महिलांच्या स्वतंत्र कोट्याचे समर्थन
पाटीदार, जाट , मराठा आरक्षणाचे समर्थन करतानाच नितीशकुमार यांनी महिला आरक्षण केवळ कल्पनाच राहील, असे म्हटले आहे. आेबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील महिलांसाठी स्वतंत्र कोटा दिल्याशिवाय महिला आरक्षण संमत होऊ शकणार नाही. बिहारमध्ये याचा अनुभव आला आहे, असे ते म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भूभाग
पाकव्याप्त काश्मीर हादेखील भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने वेळोवेळी म्हटले आहेच. ही भूमिका नि:संदिग्ध आहे. पाटण्यातील एका कार्यक्रमात नितीश यांनी काश्मीरविषयी आपली भूमिका मांडली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भूप्रदेश आहे. या मताशी आपण सहमत नसल्याचे नितीश कुमार म्हणाले. स्वतंत्र काश्मीर ही संकल्पनाच निराधार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Next Article

Recommended