आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर- काळवीट शिकारप्रकरणी बॉलीवूड स्टार सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्याविरुद्ध शनिवारी जोधपूर न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी मुख्य आरोप असलेला सलमान खान न्यायालयात हजर झाला नाही.
या प्रकरणी असलेल्या आरोपांनुसार सलमान खानने कांकानी भागात दोन काळविटांची शिकार केली होती. त्याला सैफ, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंतसिंह यांनी फूस लावल्याचा आरोप आहे. मात्र, मुख्य न्यायदंडाधिकार्यांसमोर या सर्वांनी हा आरोप नाकारला. ‘या प्रकरणात आम्ही सलमानला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही किंवा त्याला प्रोत्साहनही दिले नाही,’ अशा शब्दांत पाचही आरोपींनी न्यायालयात बाजू मांडली. अवघ्या 15 मिनिटांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली.
आरोपी कलावंत 14 वर्षांनंतर..
‘हम साथ साथ हैं’च्या शूटिंगच्या काळात सलमानने शिकार केली. 1998 मध्ये गुन्हा दाखल झाला. शनिवारी 14 वर्षांनंतर आरोपनिश्चिती झाली. सलमानच्या वतीने वकील हस्तीमल सारस्वत हजर होते.अमेरिकेत उपचार सुरू असल्याने सलमान हजर राहू शकला नसल्याचे ते म्हणाले.
सैफची जात ‘इंडियन’
कोर्टात हजर होताच सैफला न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न आणि त्याने दिलेली उत्तरे अशी- ‘नाव?’.. सैफ अली. ‘वडिलांचे नाव’.. मन्सूर अली. ‘जात?’.. हा प्रश्न विचारल्यावर, ‘आय डोंट नो’ असे सांगत सैफ म्हणाला, ‘इंडियन’!
पुढे काय ?
खटल्यात 51 साक्षीदार, 128 दस्तऐवज आणि 25 आर्टिकल आहेत. त्याच्या पडताळणीसाठी सुमारे तीन वर्षे लागू शकतात. आरोप सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.