आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये साखळी स्फोटाचा कट उघड; 27 शक्तिशाली बॉम्ब सापडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- बिहारमध्ये मोदींच्या रॅलीआधी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे सावट अद्याप दूर होत नाही तोच रांचीमध्ये इंडियन मुजाहिदीनने रचलेला साखळी बॉम्बस्फोटांचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि (एनआयए) झारखंड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका हॉटेलातून 27 शक्तिशाली बॉम्ब आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणी सापडलेले बॉम्ब हे पाटण्यात झालेल्या स्फोटांपेक्षा तीनपट जास्त शक्तिशाली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सोमवारी रात्री एनआयए, रांची पोलिस व विशेष पथकाने शहरातील हिंदपीढी भागात सेकेंड स्ट्रीट मार्गावर इरमा लॉजवर छापा टाकला. तेथील खोली क्रमांक आठमध्ये 27 जिवंत टायमर बॉम्ब (प्रत्येकी 3 बॉम्ब असलेले नऊ पॅकेट), 25 जिलेटिन कांड्या, 14 डेटोनेटर्स व 12 टायमर तसेच स्फोटकांचा साठा जप्त केला. दहशतवादी रांची शहरांत मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी करत होते, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक एम. एस. भाटिया यांनी दिली. मोरहाबादीतील आर्चरी मैदानावर नेऊन पोलिसांनी बॉम्ब एक्स्पर्टच्या मदतीने ही स्फोटके नष्ट केली. त्यासाठी जमिनीखाली मोठे खड्डे खोदण्यात आले. लॉजचा मालक मंजर इमाम यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या खोलीत स्फोटके आढळली तेथे मुजीबुल नावाचा तरुण राहत होता. तो 19 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. हे लॉज बिल्डर मंजरचे असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

आयएमचा दहशतवादी हैदरचा लॉजमध्ये मुक्काम
तीन संशयित दहशतवादी हैदर, वकास ऊर्फ जावेद व तहसीम ऊर्फ मोनू यांचा पोलिस याप्रकरणी शोध घेत आहेत. हे सर्वजण बराच वेळ इरमा लॉजवर थांबले होते. इम्तियाजने दिलेल्या माहितीनुसार रांचीमध्ये दहशतवादी हैदरचा ठावठिकाणा हा इरमा लॉज हेच होता. तेथूनच तो इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांना भेटत होता व पैसे वाटत होता. अनेक युवकांना त्याने प्रशिक्षणही दिले होते. इम्तियाज अनेकवेळा हैदरला त्याच लॉजमध्ये भेटला होता. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी लॉजवर चौकशी केली असता हैदर तेथे राहत असल्याची माहिती खरी निघाली. पोलिसांनी दहशतवादी हैदरचे छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये छापले होते. त्यानंतरही इरमा लॉजच्या मालकाने स्वत: होऊन त्याची माहिती पोलिसांना का दिली नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पोलिस या दिशेनेही तपास करत आहेत.