जिंद/सिरसा/गुडगाव (हरियाणा) - हरियाणा हे कृषिप्रधान राज्य असून येथील शेतकरी आणि जवान देशाची शान असल्याचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी येथे विधानसभा निवडणूक प्रचारसभेत म्हटले आहे.देशाच्या प्रत्येक लढाईत हरियाणाच्या सैनिकांनी बलिदान दिले आहेत. येथील सैनिकांनी वन रँक आणि वन पेन्शनसाठी लढा दिला आणि भाजपने त्यांना तो हक्क मिळवून दिला.
हरियाणातील जिंद, सिरसा आणि गुडगावमध्ये शनिवारी मोदींनी सभा घेतल्या. या वेळी ते म्हणाले, शेतक-यांना पाणी मिळाल्यास ते मातीतून सोने उगवू शकतात. आता शेतक-यांचे खिसे कधीच रिकामे राहणार नाहीत कारण जपान, चीन आणि अमेरिकेने देशात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. गुंडशाही, घराणेशाही संपवून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोदी सरकार फसवणारे
मोदी सरकार मजूर, शेतकरी आणि दुर्बल घटकांची फसवणूक करणारे असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकार खोटे बोलून सत्तेवर आली आहे. महागाई कमी करून सत्ता मिळवणा-या मोदी सरकारने भाज्या, औषधी व इतर वस्तूंचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे, असे सोनिया म्हणाल्या.