आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० लाख कमावणाऱ्या विजेंदरची आता झाली ६ कोटींपर्यंत कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - बॉक्सिंगमध्ये आता खेळासोबतच पैशाचीही रेलचेल होऊ लागली आहे. त्यामुळेच मुष्टियोद्धा विजेंदर सिंहने हौशी बॉक्सिंगला अलविदा करत प्रो बॉक्सिंगचा रस्ता धरला आहे.

हा मार्ग तितका सोपा नाही. कारण प्रो बॉक्सिंगमध्ये खेळावरच प्रसिद्धी अवलंबून आहे. प्रो बॉक्सिंगमधील रकमेचा खुलासा आयओएस किंवा क्वीन्सबरीने केला नसला तरी "दिव्य मराठी'ला मिळालेल्या माहितीनुसार, विजेंदरची कामगिरी चांगली ठरल्यास त्यास दरवर्षी ४ ते ६ कोटी रुपये मिळतील. शिवाय प्रो बॉक्सिंगची चॅम्पियनशिप जिंकल्यास त्याची कमाई २० ते २५ कोटींपर्यंत जाऊ शकते. यात प्रमोटर कंपनी क्वीन्सबरी आणि आयओसीचाही वाटा असेल. सध्या विजेंदरची वार्षिक कमाई सुमारे ३० ते ४० लाख रुपये आहे. सध्या त्याच्याकडे कोणतीही मोठी जाहिरात नाही. त्याने नुकतेच एमटीव्ही रोडिज आणि बॉलीवूडच्या फुगली चित्रपटात काम केले आहे. शिवाय कार्यक्रमांतील उपस्थिती आणि बाॅक्सिंगचे पुरस्कार हे त्याच्या उत्पन्नाचे साधन आहेत. त्यामुळे विजेंदरचा हा निर्णय फायद्याचा ठरू शकतो. भारताचे पहिले प्रो बॉक्सर राजकुमार सांगवान यांच्या मते, मुष्टियोद्धात दम असल्यास त्याची भरपूर कमाई होण्यास कोणीच रोखू शकणार नाही. आमच्या काळातही आम्हाला भरपूर रक्कम मिळाली होती. शेवटी विजेंदर हा तर ऑलिम्पिक पदकविजेता असून बराच प्रसिद्धही आहे. सांगवानने १९९६ च्या इंग्लंडमधील प्रो बॉक्सिंगमध्ये भाग घेतला होता. भारताचे प्रदीप सिहाग यांनी मागील १२ वर्षांपासून ऑस्ट्रेलियात प्रो बॉक्सिंगमध्ये सहभागी होत सुमारे २० कोटींची कमाई केली आहे.
विजेंदरला पाठबळ देणारी आयओसी स्पोर्टस्् मॅनेजमेंट अँड इंटरटेनमेंट कंपनीचे एमडी नीरव तोमर यांनी सांगितले की, आम्ही विजेंदरला सोबत घेऊन २०१६ मध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रो बॉक्सिंगच्या स्पर्धा आयोजित करू. यात भारतीय मुष्टियोद्धेही सहभागी होतील.

पहिले वर्ष ठरवेल दिशा
विजेंदरची पहिली लढत येत्या सप्टेंबरमध्ये होऊ शकते. त्याच्याशी असलेल्या ४ वर्षांच्या करारात वर्षाला ६ लढती लढाव्या लागतात. त्यामुळे पहिले वर्ष महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या २-३ लढतीत त्याचा प्रसिद्ध मुष्टियोद्ध्याशी सामना होणार नाही. सुरुवातीला त्यास ४ ते ६ व नंतर ८ फेऱ्यांपर्यंतची लढत खेळावी लागेल. विजेंदर एखाद्या टायटलसाठी रिंगणात उतरल्यास त्याला १२ फेऱ्या खेळाव्या लागतील. हा प्रो बॉक्सिंगच्या टायटलचा नियम आहे.
रिंगणात उतरण्यापूर्वीच मिळाले आव्हान
ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेला भारतीय प्रो बॉक्सर प्रदीप सिहागने "दिव्य मराठी'ला सांगितले की, मी विजेंदरशी लढायला तयार आहे. यासाठी विजेंदरनेच फेरी ठरवावी. दुसरीकडे, आपल्या आगामी योजनांचा खुलासा विजेंदर १३-१४ रोजी पत्रकार परिषदेत करणार आहे.