आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदन त्यांच्यासाठी, जे झुंजले मातृभूमीसाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमध्ये शुक्रवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या 20 जवानांना लष्करी इतमामात मानवंदनेसह अखेरची सलामी देण्यात आली. दुसरीकडे सुमारे तीन हजार लोक अद्याप बेपत्ता तर चौदाशे अजूनही अडकले आहेत. एका बाजूने बचाव सुरू असतानाच दुसर्‍याबाजूने पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत. पुरामुळे नष्ट झालेल्या चारधाममधील धर्मशाळांच्या बांधकामासाठी सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जवानांना शुक्रवारी लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. दुर्घटनेत 20 जवान शहीद झाले. त्यात पाच आयएएफ, नऊ एनडीआरएफ व सहा आयटीबीपीच्या जवानांचा समावेश आहे. या वेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा व लष्करप्रमुख विक्रम सिंग यांची उपस्थिती होती. जवानांनी प्राणाची पर्वा न करता देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांना मानवंदना हा केवळ आमच्याकडून अल्पसा प्रयत्न आहे. असे शिंदे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आजारी, वृद्ध, अपंग लोकांना ताबडतोब मदत देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. बद्रीनाथ भागात अडकलेल्यांची संख्या खूप अधिक आहे. हवाई दलाची सेवा आणखी पंधरा दिवस राहणार आहे. नागरिकांना सोडवण्यासाठी हेलिकॉप्टरची संख्याही लवकरच वाढवण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.शहीद जवानांचे मृतदेह विमान अथवा हेलिकॉप्टरने त्यांच्या गावाला पाठवण्यात आले.

प्रत्येक बेपत्ता व्यक्तीला शोधेपर्यंत बचाव कार्य सुरुच : लष्करप्रमुख
गोचर । पूरग्रस्त उत्तराखंडमध्ये अडकलेल्या शेवटच्या माणसाला वाचवेपर्यंत लष्कराची मोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी दिली आहे. सिंग यांनी शुक्रवारी गोचर भागाला भेट देऊन पाहणी केली. लष्कराचे सुमारे 8 हजार जवान बचावकार्यात आहेत. त्यांना आयटीबीपी, एनडीआरएफ व आयएएफ दलांचे सहकार्य मिळाले आहे. शहीद झालेले जवान हे भारतमातेचे पुत्र आहेत. त्यांच्या बलिदानाला आम्ही नमन करतो, अशा शब्दांत सिंग यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. लष्करप्रमुखांनी या वेळी जवानांची भेट घेऊन त्यांच्या क ामाचे कौतुक केले व मनोधैर्यही उंचावले.
धर्मशाळांची उभारणी करणार
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे धर्मशाळांची उभारणी करण्यासाठी 195 कोटी रुपयांचे पॅकेज शुक्रवारी पर्यटनमंत्री के. चिरंजीवी यांनी जाहीर केले. पुरामुळे चारधाममधील धर्मशाळा व इतर इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे बांधकाम व इतर सुविधांसाठी हा खर्च केला जाणार आहे, असे चिरंजीव यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.
बद्रीनाथवर फोकस
बद्रीनाथ भागात काही नागरिक अडकून पडलेले असल्याची माहिती लष्कराकडे आहे, परंतु परिस्थिती प्रचंड बिकट बनली आहे. चौदाशे लोक त्या भागात अडकले असावेत, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जोशीमठ-बद्रीनाथ, रुद्रप्रयाग-गौरीकुंड, उत्तरकाशी-गंगोत्री हे मार्ग खुले झाले आहेत. त्यामुळे बचाव कार्य वेगाने होईल, अशी
अपेक्षा आहे.

छायाचित्र - उत्तर प्रदेशातील हवाई दलाच्या हिंडोन तळावर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना हवाई दल प्रमुख एनएके ब्राउनी.