आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात धार्मिक प्रतिके मोडतोडप्रकरणी एकाला बेड्या; धार्मिक स्थळांवर कडेकोट बंदोबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा- दक्षिण गोव्यात मागील काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून धार्मिक प्रतिकांच्या मोडतोडीचे सत्र सुरु आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी रात्री एकाला अटक केली आहे. फ्रांसिस परेरा (रा.कुडचडे) असे आरोपीचे नाव आहे. कुडतरी येथे तो आणखी एका धार्मिक प्रतिकाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस आरोपी परेरा याच्याविरोधात‍ पुरावे गोळा करण्‍याचे काम करत आहे. त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांच्या मोडतोडीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असूनही समाजकंटक हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री मडगावपासून 8 किमी अंतरावर असलेल्या लोटली गावातील होली क्रॉसची मोडतोड करून अज्ञात समाजकंटकांनी पोलिस आणि सरकारला आव्हान दिले होते. आतापर्यंत दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी 9 होली क्रॉसची मोडतोड करण्‍यात आली आहे.

समाजकंटकांना शोधण्‍यात पोलिसांना अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोडीचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी काँग्रेसने केली होती. या घटनेस जबाबदार असलेल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. चर्च संस्‍था आणि राज्यपालांनी नागरिकांना धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...