आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरातील बौध्द पर्यटन स्थळे एकाच नकाशावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - बौद्ध धर्मीयांच्या भारतासह आशियातील सात देशांमधील ठिकाणांच्या एकत्रित माहितीचा नकाशा तयार केला जात आहे. नॅशनल अ‍ॅटलस व थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशनच्या (एनएटीएमओ) संयुक्त विद्यमाने थायलंड सरकारसोबत नकाशा तयार केला जाणार असून तो इंडो-एशियन अर्कालॉजिकल अ‍ॅटलस म्हणून ओळखला जाईल.

नकाशामध्ये भारतासह आशियातील कंबोडिया, मलेशिया, थायलंड, म्यानमार, व्हियतनाम, इंडोनेशिया व लाओसचा समावेश आहे. बौद्धांच्या धर्मस्थळांची माहिती देणारा हा अशा प्रकारचा पहिलाच नकाशा असून बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या आशियातील देशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती एमएटीएमओचे संचालक व्ही. सी. झा यांनी दिली.

नकाशाचे गेल्या महिन्यात सुरू झालेले काम 2015 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. बौद्ध धर्म अंगीकरणार्‍या नागरिकांसाठी नकाशाचा मोठा उपयोग होईल, अशी आशा झा यांनी व्यक्त केली. बौद्ध धर्म जगात चौथा मोठा धर्म मानला जातो. नकाशावर केवळ बौद्धांची धार्मिक स्थळे दिली जाणार नाहीत, तर पर्यटकांना सुलभ माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीने तो बनवला जाणार आहे, असे एमएटीएमओचे उपसंचालक बैसाखी सरकार यांनी सांगितले.

भारत उगमस्थान असलेल्या या धर्माचा अन्य देशांत प्रसार झाल्यानंतर तेथील संस्कृतीवर पडलेल्या प्रभावावर नकाशातून प्रकाश टाकला जाईल. एनएटीएमओ या कामासाठी भारतीय भू निरिक्षण उपग्रह कार्टोसॅटची मदत घेणार आहे. या नकाशावर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, लडाख, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट, हिमाचल प्रदेश आणि ईशान्य राज्यातील बौद्ध धर्मीयांची प्राचीन स्थळे येणार आहेत.

भारत-थायलंडचा संयुक्त उपक्रम
पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीनंतर विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अलीकडे झालेल्या थायलंड दौर्‍यावेळी याबाबतची प्राथमिक चर्चा झाली. यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे चारसदस्यीय शिष्टमंडळ थायलंड सरकारशी चर्चा करण्यासाठी गेले होते. नकाशा निर्मिती हा भारत व थायलंड सरकारचा संयुक्त उपक्रम आहे, मात्र एशियनच्या सरचिटणीसांनीही या कामास भरीव मदत केली आहे.