वाराणसी - गेल्या ९१ वर्षांत प्रथमच वाराणसीच्या संकटमोचन मंदिराच्या संगीत सोहळ्यात एखादा पाकिस्तानी कलाकार आला. बनारसी ‘तहजीब’ने गुलाम अलींना खेचून आणले. बुधवारपासून सुरू झालेल्या ९२ व्या सोहळ्यात व्यासपीठावर येता येता त्यांना रात्रीचा दीड वाजला. मात्र, रसिक जागचे हलले नाहीत. मैफलीत रसिकांनी शेवटपर्यंत गुलाम अलींची साथ निभावली. सुरुवातीला त्यांनी ठुमरी ऐकवली, ‘तेरे बिना लागे न जिया...’ ४० वर्षांपूर्वी हीच ठुमरी वाराणसीच्या प्रख्यात गायिका सिद्धेश्वरी देवी गात असत. मग सिलसिला सुरू झाला तो गझलांचा. काही उत्स्फूर्त, तर काही खास फर्माइशींच्या. शेवटी, ऐकवणारा व ऐकणारेही उठले; पण केव्हा, जेव्हा गुरुवारी पहाटेच्या काकड आरतीची वेळ झाली तेव्हा!