आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फूट पाडण्याचा पाकचा कट, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कठुआ - भारतात धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा कट पाकिस्तान आखत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केला. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह म्हणाले की, भारतात धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा पाकिस्तानचा कट आहे, पण त्यात त्या देशाला यश मिळणार नाही. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली आहे. आपण ती अजूनही विसरू शकलो नाही. सर्व भारतीय परस्परांचे भाऊ आहेत, मग ते हिंदू असोत की मुस्लिम. भारतात मुस्लिम शांततेने एकत्र राहत आहेत. देशातील प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्यास आणि विकासाच्या मार्गावर आगेकूच करण्यास देश वचनबद्ध आहे, हे मी गृहमंत्री म्हणून सांगू इच्छितो.

पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारत सहकार्य करायला तयार आहे, असे सांगताना राजनाथ म्हणाले की, जर पाकिस्तानला दहशतवादाचे उच्चाटन करायचे असेल आणि त्यासाठी आमची मदत हवी असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. पाकिस्तानसोबत शांततेने राहण्याची आमची इच्छा आहे, पण पाकिस्तान मात्र भारताशी छुपे युद्ध करत आहे. पाकिस्तानशी चांगले संबंध असावेत, अशी भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांची इच्छा होती, पण त्या देशाला शांततेची भाषा समजत नाही. पाकिस्तानने भारतावर चार वेळा हल्ला केला आहे, पण आमच्या शूर सैनिकांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आपण भारताला पराभूत करू शकत नाही हे वारंवार झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानला समजले आहे. त्यामुळे त्याने भारताच्या विरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. दहशतवाद हे निर्बलांचे शस्त्र आहे, शूरांचे नव्हे, असा टोलाही त्यांनी मारला.
भारतात मुळे पसरण्यात इसिसला अपयश
इस्लामिक स्टेट या संघटनेचा प्रसार होत असल्याबद्दल संपूर्ण जग चिंतित असताना ही दहशतवादी संघटना भारतात मात्र रुजू शकली नाही, असा उल्लेखही राजनाथ सिंह यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...