आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार वाहून गेली; दावा नाकारणारी कंपनी दोषी, ग्राहकाला ९ लाख १९ हजार रुपये व्याजासह देण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - केदारनाथ आपत्ती वेळी वाहून गेलेल्या कारचा दावा विमा कंपनीने नाकारला होता. मात्र, ग्राहक मंचाने दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीस सेवा कमी दिल्याचे प्रकरण ग्राह्य धरले आणि कंपनीस ९ लाख १९ हजार रुपयांचा दावा व्याजासह देण्याचे आदेश दिले. अजमेरचे रहिवासी सुनील शर्मा यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याचिकेच्या खर्चापोटी कंपनीस पाच हजार रुपये देण्यासही सांगितले आहे.
सुनील यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, ४ जून २०१३ रोजी न्यू व्हर्ना कार खरेदी केली होती. तिचा विमा उतरवला होता तसेच तात्पुरती नोंदणीही करण्यात आली होती. कार घेतल्यानंतर सहा दिवसांनी सुनील कुटुंबासमवेत १० जून रोजी चारधाम यात्रेवर गेले. यात्रेदरम्यान १५ जून २०१३ रोजी त्यांनी आपली कार गौरीकुंड येथील वाहनतळावर उभी केली आणि केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले. यादरम्यान केदारनाथमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात कार वाहून गेली. त्यानंतर कार सापडली नाही. या आपत्तीतून जीव वाचवत पोलिस ठाणे गाठले आणि कार वाहून गेल्याची तक्रार दिली.
यानंतर १ जुलै २०१३ रोजी विमा कंपनीला माहिती दिली व कारचा दावा सादर केला. मात्र, विमा कंपनीने दुर्घटनेवेळी तात्पुरती नोंदणी आणि १५ दिवसांनंतर माहिती दिल्याचे सांगत दावा फेटाळला होता. दुर्घटनेनंतर ग्राहकाने कार बेपत्ता झाल्याची माहिती तत्काळ देणे आवश्यक होते.
झालेला विलंब दावा देण्यास बंधनकारक ठरत नाही,असे कंपनीचे म्हणणे होते. मात्र,विमा कंपनीचे म्हणणे ग्राहक मंचाने फेटाळले आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश बजावले.
बातम्या आणखी आहेत...