आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीकडे वळत होते शिक्षित तरुण; पोलिसांनी चौकीतच सुरू केले करिअर मार्गदर्शन वर्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- पोलिस ठाणे म्हटले की तेथे जाण्यास कोणी तयार होत नाही. पण छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून ४५ किलोमीटरच्या अंतरावर धमतरीत बिरेझर ही एक अशी पोलिस चौकी आहे, जेथे जाण्यासाठी परिसरातील तरुण नेहमी उत्सुक असतात. कारण पोलिस कर्मचारी येथे विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करून घेतात.   
 
चौकीतील पोलिस कर्मचारी त्यांच्या कामातून वेळ काढून जिल्ह्यातील तरुणांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे देतात. दर शनिवारी दोन तास हे वर्ग चालतात. केवळ पाच विद्यार्थी घेऊन वर्गाला सुरुवात झाली होती. एका महिन्यातच ही संख्या ५० वर पोहोचली. धमतरीत करिअर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था नव्हत्या. त्यामुळे येथील तरुण गुन्हेगारीकडे वळत होते. व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बिरेझर पोलिसांनी समस्येवर लक्ष केंद्रित केले. ‘चला उद्याला घडवू’ या नावाने मोहिमेला सुरुवात झाली. तरुणांना एकत्र आणून चौकीत वर्ग घेण्यास सुरुवात झाली. सैन्यात, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांना फिटनेसचे प्रशिक्षणही दिले जाते. परिसरातील तरुणांनी शिक्षण घेतले आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने वर्ग सुरू केल्याचे चौकीतील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अहमद निझामी यांनी सांगितले. या उपक्रमासाठी धमतरीचे पोलिस अधीक्षक रजनेश सिंह, चौकीतील पोलिस शिपाई अर्जुन डहारिया, सुदर्शन निषाद आणि चंद्रपाल बर्मन यांनी सहकार्य केले. पोलिस अधीक्षकही महिन्यातून एकदा शिकवण्यासाठी येतात. 
 
चौकीतच आहे वाचनालय  
चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक जहीर म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी चौकीतच वाचनालय बनवण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून दररोज पुस्तके आणि वर्तमानपत्रे दिले जातात. धमतरीचे पोलिस अधीक्षक रजनेश सिंह म्हणाले की, करिअर मार्गदर्शन वर्गाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने गावातील जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा उपक्रम नेण्याचा मानस आहे.
बातम्या आणखी आहेत...