आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० कोटींच्या लाचखोरीप्रकरणी येदियुरप्पांंची निर्दोष मुक्तता; मुले, जावईही सुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बेल्लारी येथील अवैध खननाशी संबंधित ४० कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात येदियुरप्पा बुधवारी सुटले आहेत. याशिवाय त्यांची दोन मुले आणि जावयासह १२ आरोपींचीही न्यायालयाने सुटका केली आहे.

कर्नाटकचे तत्कालीन लोकायुक्त संतोष हेगडे यांनी २०११ मध्ये येदियुरप्पा, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य जणांना बेल्लारी जिल्ह्यातील अवैध खननाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. प्रकरणाच्या तपासानंतर सीबीआयने २०१५मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
आरोप सिद्ध करण्यात सरकार पक्ष असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत न्यायाधीश आर.बी. धरमगुडर यांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणात मुख्य आरोपी येदियुरप्पा यांच्यासह त्यांचे आमदारपुत्र बी.वाय. राघवेंद्र, बी.वाय. विजयेंद्र आणि जावई सोहनकुमार आरोपी होते. याशिवाय माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता.

सत्यमेव जयते, न्याय झाला
सत्यमेव जयते. अखेर मला न्याय मिळाला. राजकीय हेतूने प्रेरित आरोप खोटे ठरले आहेत.
-बी.एस. येदियुरप्पा ( निकालानंतर)

येदियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खाणकाम परवाना इतर लाभ मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाशी निगडित प्रेरणा ट्रस्टला ४० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, असा दावा सीबीआयने केला होता. यावरून नंतर प्रचंड वादंग उठले आणि येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. या प्रकरणात येदियुरप्पा यांना तीन आठवडे तुरुंगातही जावे लागले होते.

राज्यात २०१८मध्ये निवडणुका
दक्षिणेतील भाजपचे पहिले सरकार येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये कर्नाटकात स्थापन झाले. पुढे २०११ मध्ये त्यांना पायउतार व्हावे लागले होते. आता २०१८ मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.

> लिंगायत समाजातील बडे नेते येदियुरप्पा यांना अलीकडेच एप्रिलमध्ये भाजपने प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. निकालासाठी न्यायालयात गर्दी होती. येदियुरप्पा यांच्या समर्थकांनी बाहेर जोरदार घोषणाबाजीही केली.

> येदियुरप्पा यांनीही राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचेही म्हटले. त्यांचे आमदारपुत्र राघवेंद्र यांनीही येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असे भाकीत वर्तवले आहे.

सुप्रीम कोर्टातही धाव, २१६ साक्षी
येदि युरप्पामात्र सुरुवातीपासून हे प्रकरण म्हणजे राजकीय कारस्थान असल्याचे म्हणत होते. सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी प्रकरण रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यात त्यांना यश मिळाले नव्हते. प्रकरणात एकूण २१६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. आरोप सिद्ध झाल्याने सुटका झाली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...