गृहमंत्री शिंदे आज येथे सीआरपीएफच्या 74 व्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला हल्ल्याची सुचना दिली होती. सुचना सर्वसाधारण आहे की, विशेष हे महत्त्वाचे नाही परंतू भाजप रॅली दरम्यान घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्या दृष्टीने सुरक्षेचे उपाय करण्याची सुचना दिली गेली होती.'
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या हुंकार रॅलीआधी पाटणा रेल्वेस्टशन आणि सभास्थानी साखळी बॉम्बस्फोट झाले. यात सहा जण ठार झाले तर 80 पेक्षा जास्त जखमी झाले. शिंदेंनी सांगितले की, हल्ला नेमका केव्हा होणार याची सुचना नव्हती मात्र, रॅलीच्या दोन-तीन दिवस आधीपासून दक्ष राहण्याची सुचना देण्यात आली होती. (
गांधी मैदानात आज पु्न्हा एक बॉम्ब सापडला)
शिंदे म्हणाले, अशा प्रकारच्या सभांआधी गृहमंत्रालय सर्व राज्यांना दक्षतेच्या सुचना देत असते. संबंधीत राज्यांच्या पोलिस अधिका-यांना सुरक्षेत वाढ करण्याचीही सुचना असते. गृहमंत्री आज (मंगळवार) पाटणा दौरा करणार होते मात्र, बिहारचे मुख्यमंत्री आज (मंगळवार) पक्षाच्या चिंतन शिबीरासाठी राजगीर येथे आहेत. त्यामुळे शिंदेंनी त्यांचा दौरा रद्द केला आहे. बुधवारी नितीशकुमार दिल्लीला येणार असून ते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल देणार आहेत.
शिंदे म्हणाले, 'बिहारचे मुख्यमंत्री बुधवारी दिल्लीला येणार आहेत. ते आज पाटण्यात नसल्याने सोमवारी रात्री माझा आजचा दौर रद्द करण्यात आला. मात्र केंद्रीय गृहसचिव, अतिरिक्त सचिव आणि एनआयएचे प्रमुख आज पाटण्याला जाऊन घटनास्थाळाची पाहाणी करणार आहेत.'