आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही हिंसाचार, मृतांची संख्या 20 वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर -सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचा मृत्यू झाल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेला हिंसाचार रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. हिंसाचारात एका पोलिस काॅन्स्टेबलसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २० वर गेली आहे, तर २०० जण जखमी झाले आहेत. श्रीनगरसह पाच जिल्ह्यांत संचारबंदीसदृश निर्बंध जारी असून मोबाइल-इंटरनेट सेवा ठप्प होती.
संतप्त जमावाने अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे पोलिसांची जीप झेलम नदीत ढकलून दिली. या घटनेत फिरोज अहमद हा चालक ठार झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दुसऱ्या घटनेत पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री एका पोलिस हेडकॉन्स्टेबलच्या घरात घुसून त्याच्या दोन्ही पायांत गोळ्या झाडल्या. दमहाल हांजीपुरा येथे शनिवारी जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेले तीन पोलिस कर्मचारी अजूनही बेपत्ताच आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांनी दिली. संचारबंदीसदृश निर्बंध जारी असतानाही राज्याच्या अनेक भागांत हिंसाचार सुरूच होता. पुलवामा जिल्ह्यातील नेवा येथे निदर्शक आणि सुरक्षा दलांत रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत इरफान अहमद मलिक हा तरुण ठार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला पुलवामा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. अनंतनाग जिल्ह्यात पाेलिसांच्या गाेळीबारात तीन जण जखमी झाले.
बुरहान क्रांतिकारक : उमर : जेएनयूचा विद्यार्थी व राजद्रोहाचा अारोपी उमर खालिदने अतिरेकी बुरहान वानीची तुलना लॅटिन अमेरिकेचा क्रांतिकारक चे गुअेराशी केली आहे. यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील अचबाल येथे दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले. पांपोर येथे श्रीनगर-जम्मू महामार्गावर गोळीबारात एक युवक जखमी झाला. दक्षिण काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सहा जण जखमी झाले.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यातील जनतेला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनेही नागरिकांशी चर्चा करावी, असे आवाहन करून मेहबूबा म्हणाल्या की, राज्यातील नागरिक दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. त्यांना आता शांतता आणि स्थैर्य हवे आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी मेहबूबा मुफ्तींशी चर्चा केली आणि त्यांना सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
राज्यात २० हजार पर्यटक, यात्रेकरू अडकले
राज्यात सुमारे २० हजार पर्यटक व अमरनाथ यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून जम्मूपर्यंत सुरक्षितस्थळी पोहोचवण्याची तयारी सरकार करत आहे. सध्या या लोकांनी लष्कर व इतर सुरक्षा संस्थांच्या विविध कॅम्पमध्ये आश्रय घेतलेला आहे. अमरनाथ यात्रेकरूंचा जथ्था सलग दुसऱ्या दिवशीही जम्मूहून रवाना होऊ शकला नाही. गर्दी झाल्याने शहरातील अनेक मंदिरे व शाळांत त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली.
पुढील स्लाइडवर पाहा, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीचा एन्काउंटर केल्यानंतर काश्मीरमध्ये उडालेली धुमश्चक्रीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...