आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षांत 1000 पन्नीरसेलव्हम पाहिलेत-शशिकला; पन्नीरसेल्व्हम पोहोचले CM कार्यालयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई-तमिळनाडुमध्ये सरकार स्थापन करण्‍याबाबत अद्याप कोणताच ठोस तोडगा निघालेला नाही. अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली आहे. शशिकला आणि पन्नीरसेल्व्हम यांच्यात सुरु असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचलाळ आहे. शशिकला नटराजन यांनी सोमवारी सांगितले की, अम्मांचे निधन झाले तेव्हा अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. पण, मी असे घडू देणार नाही. मी 33 वर्षांत  असे 1000 पन्नीरसेल्व्हम पाहिले आहेत. त्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही. 

दरम्यान, दुसरीकडे, पोलिसांनी गोल्डन-बे रिसॉर्टमधील 119 आमदारांचे जबाब नोंदवल्याचे पक्षाने मद्रास हायकोर्टात  सांगितले आहे. बहुतांश आमदारांचा शशिकला यांना पाठिंबा आहे. राज्यपाल आज शशिकला यांना केव्हाही निमंत्रण पाठवू शकतात, असा दावा पक्षाचे प्रवक्ते वईगई छेलवन यांनी केला आहे. पन्नीरसेल्वम यांना केवळ 7 आमदारांचे समर्थन आहे. परिणामी ते विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकत नाहीत.

काळजीवाहू मुख्यमंत्री पोहोचले कार्यालयात...
काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेलव्हम कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी आपले काम सुरु केले आहे. 

हायकोर्टाने निर्णय ठेवला राखून...
- आमदार बेपत्ताप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या दोन याचिकांवर (habeas corpus) सोमवारी सुनवणी झाली. 
- हायकोर्टाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे. 
- या प्रकरणी 10 फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. गोल्डन- बे रिसॉर्टमध्ये वेठीस ठेवलेल्या आमदारांपैकी 20 आमदारांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
- आमदारांना रिसॉर्टमध्ये खरंच वेठीस धरले असेल आणि त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला असेल तर ही चिंतेची बाब असल्याचे हायकोर्टने म्हटले होते. 

पन्नीरसेल्व्हम म्हणाले,  शशिकलांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू
पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यातील सत्तासंघर्षात सेल्वम यांची बाजू बळकट होत चालली आहे. अण्णाद्रमुकच्या आणखी पाच खासदारांनी पन्नीरसेल्वम यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांची संख्या 10 वर तर आमदारांची संख्या 7 वर पोहोचली आहे. शनिवारीही पाच खासदारांनी पन्नीरसेल्वम गटाला पाठिंबा दिला होता. यामुळे शशिकला समर्थकांतही अस्वस्थता पसरली आहे. अण्णा द्रमुकचे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 खासदार आहेत.

दुसरीकडे, शशिकला नटराजन यांनी रविवारी कूवथूर येथील गोल्डन-बे रिसॉर्टमध्ये सर्व आमदारांची बैठक घेतली. बैठकीला पत्रकारही उपस्थित होते. शशिकला यावेळी भावूक झाल्या होत्या. त्या पत्रकारांना उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही सत्य पाहू शकतात. आमदारांवर कुठलीही जोरजबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. येथे सगळे आनंदात राहात आहे. विरोधक मात्र, अफवा पसरवत आहेत. आमदारांना वेठीस धरल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला आहे.' 

गोल्डन-बे रिसॉर्टमधील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा पन्नीरसेलव्हम यांनी केला आहे. प्रत्येक आमदारांवर चार गुंड वॉच करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना टॉर्चर करण्यात येत आहे. शशिकला या नाटकी असून त्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी हे मगरी अश्रु आहेत. दरम्यान, पन्नीरसेल्वम यांनी शशिकलांवर आमदारांना रिसॉर्टमध्ये वेठीस धरल्याचा आरोप केला आहे. 

पन्नीरसेल्वम यांचे पारडे जड; अॅक्टर्सचाही पाठिंबा
जयसिंग त्यागराज नटर्जी, सेनगुट्टयन, आर. पी. मरुथराजा आणि एस. राजेंद्रन या लोकसभेच्या चार खासदारांनी रविवारी सकाळी पन्नीरसेल्वम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला. राज्यसभेचे खासदार आर. लक्ष्मणन यांनीही पन्नीरसेल्वम यांच्या गटात प्रवेश केला. शनिवारीही पाच खासदारांनी पन्नीरसेल्वम गटाला पाठिंबा दिला होता.
 
अद्रमुकचे लोकसभेत ३७ तर राज्यसभेत १३ खासदार आहेत. पन्नीरसेल्वम यांना पक्षाच्या सहा आमदारांचाही पाठिंबा आहे. माजी आमदार बदर सईद आणि मुथुसेल्वी यांनीही रविवारी मुख्यमंत्र्यांच्या गोटात प्रवेश केला.  दरम्यान, जयललिता यांचे कट्टर समर्थक असलेले अभिनेते रामराजन आणि थियागू आणि माजी आमदार तथा अभिनेता-दिग्दर्शक अरुणपांडियन यांनीही रविवारी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवला. 

राजकारण महिलांसाठी कठीण: शशिकला  
दरम्यान, राजकारण हे क्षेत्र महिलांसाठी अत्यंत कठीण आहे, जयललिता यांच्या काळापासून त्याचा अनुभव मी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया शशिकला यांनी रविवारी नोंदवली. आमदार माझ्यासोबत असून, अद्रमुकचे सरकार पुढील चार वर्षे सत्तारूढ राहून जनतेची सेवा करेल. पोएस गार्डन या निवासस्थानी पत्रकारांना संबोधित करताना शशिकला यांनी सांगितले की, राज्यपाल राव यांना संबोधित करणारे माझ्या नावाचे खोटे पत्र जारी झाले आहे. राजकारणात असणे महिलांसाठी कठीण काम आहे.

पन्नीरसेल्व्हम पक्षाविरोधात कुरघोडी करत असल्याचा आरोप शशिकला यांनी केला आहे. रिसॉर्टमध्ये त्या पत्रकारांना संबोधित करत होत्या. पन्नीरसेल्व्हम पक्षाविरोधात कुरघोडी करत आहेत. खोट्या अफवा पसरवत आहेत. विरोधकांना सहकार्य करत आहेत. मात्र, ते कधीही यशस्वी होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
 
राज्यपालांनी सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा; अन्यथा खटला : स्वामी  
राज्यपाल विद्यासागर राव यांनी सरकार स्थापनेबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा; अन्यथा त्यांच्याविरोधात घटनेच्या कलम ३२ नुसार खटला दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे दिला आहे. शशिकला यांच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ द्यावी, असे स्वामींचे म्हणणे आहे. मात्र, राज्य भाजपने स्वामींच्या विरोधात वक्तव्य दिले आहे. हे स्वामींचे वैयक्तिक मत आहे, प्रदेश भाजपचे नाही, अशी प्रतिक्रिया तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष टी. सुंदरराजन यांनी दिली.
 
आणखी ११ आमदार फुटल्यास शशिकला अडचणीत : अद्रमुकचे १३५ आमदार आहेत. बहुमतासाठी ११८ चे संख्याबळ आवश्यक आहे. पन्नीरसेल्वम यांच्यासोबत सात आमदार आहेत. आणखी ११ आमदार त्यांच्यासोबत आले तर शशिकलांची बहुमताची ताकद हिरावली जाईल. ११ आमदार फुटल्यानंतर शशिकलांकडे ११७ आमदारच राहतील.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...