चेन्नई - शनिवारी कोसळलेल्या 11 मजली इमारतीच्या ढिगार्याखालून तब्बल 60 तासानंतर (मंगळवार) तीन व्यक्ती जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. एक 50 वर्षीय महिला मात्र दुर्दैवी ठरली. 60 तास मृत्यूशी संघर्ष करुन बाहेर आलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडे 28 झाला आहे. अजूनही 18 जण ढिगार्याखाली असल्याचा अंदाज आहे. तीन व्यक्ती जिवंत बाहेर आल्यामुळे ढिकार्या खालून आणखी अनेकजण मरणाच्या दारातून बाहेर येतील अशी आशा त्यांच्या आप्तांना आहे.
आज (मंगळवारी) जिवंत बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये महेश (23), अनसुया (30) दोघेही आंध्र प्रदेशचे राहाणार आहेत. तर, 27 वर्षीय सेथींल तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील आहे.
तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आल्यानंतर बचाव पथकाचे कर्मचारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. अतिशय सावधगिरीने ते ढिगारा उपसत आहेत.
28 जून रोजी बांधकाम सुरु असलेली एक इमारत कोसळून ही दुर्घटना घडली. या प्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.