आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: अंगाई ऐकून कोमातील बाळाने उघडले डोळे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुद्धीत आल्यानंतर आई-वडिलांना निरखताना कपिल. - Divya Marathi
शुद्धीत आल्यानंतर आई-वडिलांना निरखताना कपिल.
जयपूर - अडीच वर्षांचा चिमुकला दीड महिन्यापासून कोमात होता. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक त्याच्या आईच्या आशा मंदावत चालल्या होत्या. बाबांची धडपड फोल ठरत होती. प्रत्येक उपचार अपयशी होत होता. यामुळे निराश डॉक्टरांनी अखेरचा उपाय म्हणून चित्रपटात शोभेल अशी कल्पना लढवली. ती म्हणजे आईची आर्त हाक चिमुकल्याच्या कानात पोहोचवण्याची... अन् चमत्कारच घडला! केवळ दोनच दिवसांत चिमुकल्याने डोळे उघडले.
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात बानसूर गावातील हा किस्सा. कपिल या चिमुकल्याला अडीच महिन्यांपूर्वी न्यूमोनिया झाला. वडील बलवीर यांनी त्याला जवळच्या रुग्णालयांत दाखवले. मात्र, प्रकृती बिघडल्याचे पाहून डॉक्टरांनी जयपूरला हलवण्यास सांगितले. जयपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले. मात्र, येथे त्याच्या मेंदूत रक्तस्राव म्हणजेच ब्रेन हॅमरेज झाला. कपिल कोमात गेला. या धावपळीत दोन महिने गेले तसेच ११ लाख रुपये खर्च झाले. बलवीर यांचा खिसा रिकामा होताच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलाला तेथून घेऊन जाण्यास सांगितले.नंतर कपिलला जे.के. लाेन या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

पुढील किस्सा कपिलवर उपचार करणारे डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितला. ते म्हणाले, त्याला २५ मे रोजी आमच्याकडे आणले तेव्हा तो व्हेंटिलेटरवर होता. तो बरा होण्याची आशा जवळपास नव्हतीच. सुरुवातीच्या उपचारांत अपयशच आले. शेवटी आम्ही त्याला म्युझिक थेरपी देण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीत बहुतेक वेळा रुग्णांना अाध्यात्मिक संगीत ऐकवले जाते. मात्र, इतक्या लहान बाळावर त्याचा परिणाम होणे अशक्य होते. म्हणून आम्ही कपिलच्या आईच्या अावाजातील अंगाईगीते व गाणी रेकॉर्ड करून त्याला ऐकवली. ही मात्रा इतकी लागू पडली की दोनच दिवसांत त्याच्या शरीराची हालचाल सुरू झाली. त्याने डोळे उघडले, हातपाय हलवले व रडायलाही लागला. आमच्यासाठी हे मोठे यश अन् तितकाच मोठा धडाही अाहे. कारण यापूर्वी इतक्या लहान मुलावर असा प्रयोग कधी केला नव्हता. आता त्याच्यावर औषधांचा परिणाम वेगाने होईल, लवकरच तो खेळू-बागडू लागेल ही आशा आहे.