पोर्ट ब्लेअर - अंदमानपासून 20 किलोमीटर अंतरावर चीनच्या कुरापती सुरू आहेत. चीन तेथे रस्ता आणि धावपट्टी बनवण्याची तयारीला लागला आहे. एवढेच नाही तर चीनच्या गुप्तहेर विभागाचे केंद्रदेखील त्या भागात आहे. त्यामाध्यमातून भारतावर निगराणी ठेवण्यात येत आहे. अंदमान-निकोबारच्या उत्तरेकडील सीमेपासून केवळ 20 किमी अंतरावर आहे. कोको बेट अगोदर भारताचा घटक होता. सध्या तो म्यानमारचा भाग आहे. म्यानमारने हा भूभाग चीनला दिला आहे.
अंदमान निकोबार तटरक्षणाची आघाडी सांभाळणारे एअर माश्रल पी.के. रॉय यांनीदेखील कोको बेटावरील चीनच्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. चीनने बेटावर धावपट्टी बनवण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात माजी नौदलप्रमुख निवृत्त अँडमिरल अरुण प्रकाश यांनी अंदमान दुसरे कारगिल बनू शकते, असा इशारा दिला होता. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर रॉय म्हणाले, देशात कुठेही काही होऊ शकते. कारगिल असो की मुंबई, हल्ला कोठेही होऊ शकतो. व्यूहरचनेच्या दृष्टीने अंदमान अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु आमचे दल कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी तत्पर असल्याचे रॉय यांनी स्पष्ट करतानाच त्यांनी प्रकाश यांच्या वक्तव्याचे खंडन केले.
तणाव निर्माण होऊ नये, हाच प्रयत्न : एअर माश्रल : चीनसोबत अंदमान-निकोबार क्षेत्रातही सीमावाद असल्याचे एअर माश्रल यांनी मान्य केले. दोन्ही देश परस्परांना शत्रू म्हणून पाहू लागले तर उभय देशांची प्रगती कधीही होणार नाही. त्यांच्या मुकाबल्यासाठी आपण मार्ग काढत आहोत, असे रॉय यांनी सांगितले.