आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clash In Kolkata Between Trinmool Congress And CPI Activist

ममता समर्थक-विरोधकांच्या मोर्चांनी कोलकाता दणाणले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- प्रेसिडेन्सी विद्यापीठ व महाविद्यालयावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस आणि माकप यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या आठवड्यात एसएफआयचा विद्यार्थी नेता सुदीप्तो गुप्ता याचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, त्यापाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर दिल्लीत झालेला हल्ला आणि बुधवारी प्रेसिडेन्सी विद्यापीठावर झालेल्या हल्यानंतर गुरुवारी ममता समर्थक आणि विरोधकांच्या मोर्चांनी कोलकाता दणाणले. प्रेसिडेन्सीच्या कुलगुरुही ममता विरोधक विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

ममता आणि पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांच्यावर झालेल्या हल्यानंतर बुधवारी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी विद्यापीठावरील हल्ला झाला होता. या हल्याबद्दल तृणमूल आणि माकप एकमेकांना जबाबदार धरत होते.परंतु गुरुवारी विविध वृत्तवाहिन्यांनी हल्याचे फू टेज दाखवले यामध्ये तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक पार्थ बसू आणि कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात तोडफोड केल्याचे दिसत आहे. मात्र, बसू यांनी हल्याचा आरोप फेटाळला. ममता आणि मित्रांवरील हल्यांच्या निषेधार्थ विद्यापीठाबाहेर निदर्शने करीत असताना कार्यकर्त्यांवर विटा फेकण्यात आल्या. त्याला चार टाके पडल्याचा दावा बसू यांनी केला आहे.

कुलगुरूंचा तृणमूलवर आरोप
तृणमूलचे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड के ली. विविध विभागांमध्ये गोंधळ घातला, असा आरोप विद्यापीठाच्या कुलगुरू मलाबिका सरकार यांनी केला आहे. याप्रकरणी सरकार कुलपती आणि राज्यपाल एम. के . नारायणन यांना पत्र पाठवणार आहेत.


हल्लेखोर गुन्हेगारच
प्रेसिडेन्सी विद्यापीठावर हल्ला करणार्‍यांवर गुन्हेगारांप्रमाणेच कारवाई करण्यात येईल, असे कुलपती अणि राज्यपाल एम.के. नारायणन यांनी सांगितले. या प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगानेही गंभीर दखल घेतली असून पोलिस आयुक्तांना तपशीलवार अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

दोन जणांना अटक
प्रेसिडेन्सी विद्यापीठावर हल्ल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुरुवारी सुदीप बर्मन आणि जयंता या दोन जणांना अटक केली. विद्यापीठातील बेकर प्रयोगशाळा आणि इतर दोन विभागांमध्ये तोडफोड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र, हे दोघे कोणत्या पक्षाचे अथवा संघटनेचे आहेत हे पोलिसांनी जाहीर केले नाही.