आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्‍ये महाराष्‍ट्रातील दोन जवान शहिद, एका हेलिकॉप्‍टरचे इमरजन्‍सी लँडींग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमध्‍ये बचाव कार्यादरम्‍यान झालेल्‍या हेलिकॉप्‍टर अपघातानंतर शहिद झालेल्‍या 20 जवानांचे मृतदेह शोधण्‍याचे काम पूर्ण झाले असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अपघातग्रस्‍त हेलिकॉप्‍टरचा ब्‍लॅक बॉक्‍स सापडल्याने अपघाताचे कारण स्‍पष्‍ट होऊ शकेल. बचाव कार्यात गुंतलेल्‍या जवानांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी वायुसेनाप्रमुख एन. ए. के. ब्राऊन आज (मंगळवार) सकाळी डेहराडून येथे दाखल झाले. त्‍यांनी अपघातात शहीद झालेल्‍या जवानांना श्रद्धांजली वाहिली. या जवानांच्‍या कुटुंबियांच्‍या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असे वायुदलप्रमुख म्‍हणाले.

शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्राचे दोन सुपूत्र:
गौरीकुंडात कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात महाराष्‍ट्राचे दोन जवान शहीद झाले आहेत. धुळ्याचे शशिकांत पवार आणि जळगावचे गणेश अहिरराव या दोन्ही जवानांचा या बचाव कार्यात या मोहिमेत शहीद झाले आहेत. दोघेही 'नॅशनल डिझास्‍टर रिलीफ फोर्स' (एनडीआरएफ) मध्‍ये कार्यरत होते. दोघांचे पार्थिव उद्या (गुरुवारी) महाराष्‍ट्रात आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शहीद जवांनाच्या कुटूंबियांना शासकीय मदतही दिली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

खराब हवामानामुळे बचाव कार्यात आजही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बहुतांश हेलिकॉप्‍टर्स जमिनीवरच आहेत. एका हेलिकॉप्‍टरचे डेहराडून येथे इमरजन्‍सी लँडींग करण्‍यात आले आहे. मेघालय सरकारचे हे हेलिकॉप्‍टर असल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे.

गौचर एअरबेसवर वायुदलप्रमुखांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्‍यावेळी त्‍यांनी सांगितले, की हेलिकॉप्‍टरचा अपघात तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे झाला असावा. कोणतीही शक्‍यता नाकारता येत नाही. ब्‍लॅक बॉक्‍समधून सविस्तर माहिती मिळेल. अपघात झाला त्‍यावेळी एकूण तीन हेलिकॉप्‍टर कार्यरथ होते. या अपघातानंतरही जवानांचे मनोधैर्य खचलेले नाही. बचाव मोहिम पूर्ण होईपर्यंत जवान मागे हटणार नाहीत. हवामान सामान्‍य होऊन मोहिम पूर्ण करण्‍यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात. मात्र, अडकलेल्या सगळ्या नागरिकांना वाचविण्‍यात येत नाही, तोपर्यंत मोहिम थांबणार नाही, असे वायुदलप्रमुखांनी स्‍पष्‍ट केले.


मंगळवारी झाला होता अपघात

उत्तराखंडमधील प्रलयात प्राण गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी साहित्य व लाकडे घेऊन जाणारे वायुदलाचे हेलिकॉप्टर मंगळवारी गौरीकुंडजवळ कोसळले. या दुर्घटनेत 20 जवान शहीद झाले. लष्कराचे हे सर्वात मोठे हेलिकॉप्टर केदारनाथहून परतताना दुपारी 12 वाजता दरीत कोसळले. यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 9, आयटीबीपीचे 6 व हवाई दलाचे 5 जवान होते. अशा हवामानात उड्डाण करणे जोखमीचे असले तरी अडकलेल्या प्रत्येकाची सुटका केल्याखेरीज मोहीम थांबणार नाही, वायुदलाने म्हटले आहे

दरम्यान, केदार खोर्‍यात मंगळवारी 127 मृतदेह सापडले. आजवर 822 मृतदेह हाती लागले आहेत. हा आकडा मोठा असण्याचा अंदाज आहे. डोंगरात पडलेले मृतदेह कुजत आहेत. 24 तासांत त्यांच्यावर अंत्यविधी व्हायला हवेत, असे पथकाचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशपर्यंत मृतदेह वाहत गेले आहेत. मुजफ्फरनगर, बुलंदशहर, बिजनौरमध्ये 15 मृतदेह सापडले.

खराब हवामानामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यासाठी लाकडे आणि इतर साहित्‍यांचा तुटवडा आहे. पावसामुळे उपलब्‍ध लाकडेही ओली झाले आहेत. तर अनेक ठिकाणी मलब्‍याखाली दबलेल्‍या मृतदेहांचे जनावरे लचके तोडत आहेत. ही विदारक स्थिती विचलित करणारी आहे. त्‍यामुळे मृतदेहांचा शोध घेण्‍सासाठी आता ड्रोन विमानांचा वापर करण्‍यात येत आहेत. पूरग्रस्‍त भागात अजुनही 6 हजार लोक अडकल्‍याची माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे. तर सर्वोच्‍च न्‍यायालयानेही बचाव मोहिम तीव्र करण्‍याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

हेलिकॉप्‍टर अपघातात शहिद झालेल्‍या जवानांची यादी... वाचा पुढील स्‍लाईडवर