अलीगड (उत्तरप्रदेश) - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधीत धर्म जागरण समितीच्या वतीने अलिगड येथे 25 डिसेंबर रोजी नियोजीत धर्मांतर सोहळा वादाच्या भोवर्यात अडकल्यानंतर आता हा कार्यक्रम होणार की नाही, याबद्दलही शंका निर्माण होत आहे. समितीने ज्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कॉलेज प्रशासनाने कार्यक्रमासाठी मैदान देण्यास नकार दिला आहे. आता चेंडू अलिगड प्रशासनाच्या कोर्टात आहे.
धर्म जागरण समितीद्वारा नियोजित कार्यक्रम अलिगड येथील महेश्वरी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठीची परवानगी समितीचे संयोजक बृजेश कंटक यांनी 19 नोव्हेंबर रोजी मागितली होती. त्यांना शुक्रवारी कॉलेज प्रशासनाकडून पत्र आले. त्यात म्हटले आहे, की कॉलेजच्या मैदानावर केवळ हिंदू संमेलनाला परवानगी दिली जाईल. धर्मांतरासारख्या कार्यक्रमासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी गरजेची आहे.
कॉलेजचे प्रवक्ते गिरिराज किशोर गोदानी म्हणाले, 'महेश्वरी कॉलेजने धर्म जागरण समितीला फक्त हिंदू संमेलनासाठी खेळाचे मैदान देण्याची तयारी दाखविली होती. येथे धर्मांतर किंवा धर्म परिवर्तन यासारखा कोणताही कार्यक्रमासाठी मैदान दिले जाणार नाही. दुसरे असे, की धर्म जागरण समितीला कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. सुरक्षेची जबाबदारी धर्म जागरण समितीलाच घ्यावी लागेल.'
काय काम आहे, धर्म जागरण समितीचे
धर्म जागरण समिती गेल्या तीन वर्षांत ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म स्विकारलेल्या लोकांना हिंदू धर्मात आणण्याचे काम करत आहे. त्याला त्यांनी घर वापसी हे नाव दिले आहे. त्यांचा दावा आहे, की हे लोक हिंदू होते आणि त्यांनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्विकारला त्यांची घर वापसी केली जात आहे.
हवन आणि यज्ञ करुन गंगाजळ प्राशन करुन त्यांना शुद्ध केले जाते. यात आर्य समाजाचे मोठे सहकार्य मिळत असेत. गेल्या वर्षीही 25 डिसेंबरला धर्मांतराचे कार्यक्रम झाले होते, असा समितीचा दावा आहे. मागील वर्षी अलिगडमधील महाऊर पूर्व माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम झाला होता. तेव्हा 500 लोकांना हिंदू धर्मात आणले गेले होते.
फाइल फोटो - आग्रा येथे झालेल्या कथित धर्मांतराचे छायाचित्र.
पुढील स्लाइडमध्ये, आग्रा येथील कथित धर्मांतरीत मुस्लिमांनी अदा केली नमाज