आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला गळती, त्रिपुरात ६ आमदारांनी सोडला पक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा - अरुणाचल प्रदेश, आसामनंतर आता त्रिपुरात काँग्रेसला गळती लागली आहे. पक्षाच्या सहा आमदारांनी सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे डाव्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात तृणमूल नवीन विरोधी पक्ष बनू शकतो.

काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सुदीप रॉय बर्मन यांनी त्रिपुराचे सभापती रमेंद्र देबनाथ यांना पाठवलेल्या पत्रात आम्ही पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. त्यात बर्मन यांच्यासह विश्वबंधू सेन, दिबाचंद्र हरंखावल, आसिस साहा, दिलीप सरकार, प्राणजित सिन्हा रॉय यांचा बंडखोर आमदारांमध्ये समावेश आहे. सभापतींनी बंडखोरांचे पत्र मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यावर सहा आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्व आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची माहितीही पत्रातून दिली आहे. बर्मन यांची तृणमूलच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळेच बर्मन यांनी मुख्य विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा सांगितला आहे. काँग्रेसमधील या बंडामुळे पक्षाला मोठी भगदाड पडले आहे. ६० सदस्यीय विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या १० वरून आता ३ अशी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बिरजित सिन्हा व अन्य दोन आमदारांनी मात्र काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी डाव्या पक्षाकडे ५० आमदार आहेत. पक्षातून बाहेर पडलेले जितेन सरकार यांनी माकपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सरकार हे माकपचे माजी आमदार असून पाच वेळा ते माकपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. नऊ वेळा ते विधानसभेचे सभापती राहिले आहेत. दरम्यान, बर्मन यांनी अगोदर काँग्रेस-डाव्या आघाडीचा निषेध करून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

प.बंगालमधील निर्णयातून नाराजी
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. ही बाब बंडखोर आमदारांना आवडली नाही. ही आघाडी झाली नसती तर ममता बॅनर्जी यांचा आणखी मोठा विजय झाला असता.

चौथे राज्य
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयानंतर बंडखोरीची झळ बसलेले त्रिपुरा हे चौथे राज्य ठरले आहे. २०१८ मध्ये त्रिपुरात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. पक्षीय बंडखोरीचा परिणाम आगामी निवडणुकीतही दिसून येऊ शकतो.

डाव्यांना पराभूत करू
काँग्रेसला सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आमचा निर्णय हा सत्ताधारी डाव्या सरकारचा पराभव करण्यासाठी घेण्यात आला आहे. हे सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, असे बर्मन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...