आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Free India, Narendra Modi Appeal Of Matma Gandhi's Congress Free

भारत काँग्रेसमुक्त करा, नरेंद्र मोदींची महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करण्‍याची हाक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - ‘देशाला आता काँग्रेसमुक्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,’ असे टीकास्त्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सोडले. ते म्हणाले, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपची लाट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


काँग्रेसच्या विसर्जनाची महात्मा गांधी यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोदींनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. मग प्रश्न विचारला, गांधीजींची शेवटची इच्छा काय होती? नंतर स्वत:च उत्तरले, भारतातून काँग्रेस संपवून टाकावी. काँग्रेसमुक्त भारत. आता ही जबाबदारी भाजपला आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारच्या 10 वर्षांच्या सत्तेने कळस गाठला आहे. तुम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचा पहिला 1 आकडा भोपाळमध्ये लिहिला आणि लिहीतच गेलात तर शेवटचे शून्य दिल्लीतील 10 जनपथपर्यंत जाईल, इतका अब्जो-खर्व रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


जांबुरी मैदानावरील कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यास सुमारे पाच लाखांची गर्दी उसळल्याचा दावा केला जात आहे. क्वचितच मध्य प्रदेशला भेट देणारे मोदी मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले की, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आपले नव्हे तर सीबीआयचे उमेदवार उभे करेल.


महात्मा गांधी यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोदींनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. मग प्रश्न विचारला, गांधीजींची शेवटची इच्छा काय होती? नंतर स्वत:च उत्तरले, भारतातून काँग्रेस संपवून टाकावी. काँग्रेसमुक्त भारत. आता ही जबाबदारी भाजपला आपल्या खांद्यावर घ्यायची आहे.


जगातील सर्वात मोठ्या राजकीय जमावाचा दावा करत अभूतपूर्व जनसागरच (50 हजार मतदान केंद्रांवरील मतदान प्रतिनिधी) नव्हे तर, अडवाणी व मोदी या दोन धुरंधरांना अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याची किमया मध्य प्रदेश भाजपने साधली.


आयुष्यात पहिल्यांदाच असा अभूतपूर्व जनसंगम बघितल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती. 2008 विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने याच मैदानावर दोन लाख कार्यकर्त्यांचा जमाव जमवला होता. मात्र ‘दिव्य मराठी’शी बोलताना पोलिसांनी आजचा जमाव 3 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितले.


ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त पक्षाने बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. भाषणात वेळोवेळी उपाध्याय यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, मी पक्षाचा एक सामान्य संघटक आहे. आजचा हा महामेळावा म्हणजे पंडित उपाध्याय यांना सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली ठरावी, असे ते म्हणाले.


नोव्हेंबरमधील मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या मोदी आणि अडवाणी या भाजपच्या दोन दिग्गजांसह मेळाव्यात पक्षाध्यक्ष राजनाथसिंह, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, वैंकय्या नायडू, माजी मुख्यमंत्री तथा उपाध्यक्ष उमा भारती आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी नेते उपस्थित होते.


भाजपच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवराजसिंह चौहान यांच्या विनम्रतेसह त्यांच्या विकासाभिमूख राजकारणाची स्तुती केली. मोदी यांनी 35 मिनिटांच्या भाषणात वाजपेयी-अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे गोडवे गायले. या सरकारची सत्ता न्यायी, विकासाभिमूख आणि गरीबांच्या हितासाठीची होती. मात्र सध्याचे काँग्रेस सरकार आपल्या पक्षाचीच सत्ता असलेल्या राज्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर चौफेर टीका केली खरी मात्र एकदाही सोनिया गांधी किंवा मनमोहनसिंग यांचा उल्लेख केला नाही.


भाजपशासित राज्यांसोबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करत आहे. एकीकडे केरळला झुकते माप मिळते, तर दुसरीकडे मध्य प्रदेशला डाववले जात असल्याचा आरोप मोदींनी केला. सरदार सरोवर प्रकल्पावरील धरण पूर्णत्वास जाऊनही त्यावर विसर्ग दरवाजे बसवण्याचा परवानगी देत नाही. कारण, यामुळे विद्युतनिर्मितीत वाढ होऊन मध्य प्रदेशची आणखी भरभराट होईल, अशी काँग्रेसला भीती आहे.


काँग्रेस गरीब व विकासविरोधी असल्याचे सांगत मोदी म्हणाले, काँग्रेस सत्तेच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मध्य प्रदेश ‘बीमारू’ श्रेणीतील राज्य बनवून टाकले होते. भारताला काँग्रेसमुक्त बनवण्याचे पहिले पाऊल मतदान केंद्रांपासून टाकावे लागेल, नव्हे तर प्रत्येक मतदान केंद्रच काँग्रेसमुक्त बनवा, असे आवाहनही मोदी यांनी केले.


अडवाणींकडून कौतुक
मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आलेल्या मोदी आणि अडवाणींवर सर्वांच्या नजरा होत्या. अडवाणींनी आपल्या छोटेखानी भाषणात गुजरातच्या विकास मॉडेलची (मध्य प्रदेश व छत्तीसगडचीही) प्रशंसा करत मोदींना शाबासकीही दिली. विराट जनसमुदायासमोर व्यासपीठावर पाया पडण्यासाठी मोदी झुकले असताना अडवाणींचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते.