आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress JMM Come Together For Founding Government In Jharkhand

झारखंडमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू , काँग्रेस-झामुमो एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत 18 जुलै रोजी संपुष्टात येत असल्यामुळे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी मंगळवारी चर्चा सुरू केली.
काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद, झारखंडचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद, प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आर. पी. सिंग यांनी झामुमोचे सर्वेसर्वा शिबू सोरेन आणि त्यांचे पुत्र हेमंत यांच्याशी चर्चा केली. सरकार स्थापनेसंबंधी त्यांनी गुरुजी (शिबू सोरेन) आणि हेमंत सोरेन यांच्याशी चर्चा केल्याचे झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले. राष्ट्रीय जनता दल आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता बळावली असतानाच सरकार स्थापनेसाठी झामुमोशी चर्चा सुरू ठेवण्यासाठी अहमद, प्रसाद आणि अन्य काही नेते दिल्लीला जाणार असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. सरकार स्थापनेबाबतच्या संभाव्य पुढाकाराबाबत छेडले असता ‘मी तुम्हाला उद्या सांगेन’ असे हेमंत सोरेन म्हणाले. हेमंत आधीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.


राजदचे कानावर हात
सरकार स्थापनेबाबत त्यांनी काय पुढाकार घेतला, याबाबत आम्हाला काहीएक माहिती नाही. आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे राजद विधिमंडळ पक्षाच्या नेत्या अन्नपूर्णादेवी म्हणाल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याबरोबरच त्यांनी पुढाकार का घेतला नाही, एवढा उशीर कशासाठी लावला, असा सवालही त्यांनी केला.


पक्षीय बलाबल
एकूण सदस्य
संख्या 82


बहुमतासाठी
गरज 42

झामुमो- 18
काँग्रेस- 13
राजद-5
भाजप- 18
झाविमो-11
अन्य-11


अपक्षांवर मदार
झारखंड विधानसभेत साधे बहुमत प्राप्त करण्यासाठी काँग्रेस आणि झामुमोचे नेते काही अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप- झामुमो युतीच्या सरकारमध्येही काही अपक्ष होते. 8 जानेवारी 2013 रोजी झामुमोने पाठिंबा काढून घेतल्यानंतर 18 जानेवारी रोजी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.