चेन्नई - युपीए सरकारमधील तत्कालीन केंद्रीय जहाज बांधणी मंत्री आणि तामिळनाडू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.के.वासन यांनी सोमवारी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच त्याचवेळी
आपण स्वतंत्र पक्ष काढत असल्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळे राज्यात काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने शनिवारीच वासन यांचे नीकटवर्तीय बी.एस.गनादेसीकन यांच्या जागी ईव्हीकेएस एलांगोवा यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक केली होती. त्यानंतर वासन यांनी असे संकेत दिलेच होते. वासन यांच्याबरोबरच राज्यातील काही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
राज्यात 2016 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने वासन यांचे हे पाऊल त्याच पार्श्वभूमीवर उचलण्यात आल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. राज्यात भाजप स्वतःला एक सशक्त पर्याय म्हणून प्रोजेक्ट करत असल्याने वासन यांच्या या निर्णयाला म्हत्त्व प्राप्त झाले आहे.
आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना वासन म्हणाले की, आपण नवीन पक्ष स्थापन करत आहोत. गेल्या 47 वर्षांपासून काँगेसला राज्यात सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे मी राज्यात एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. राज्यात म्हणजेच तामिळनाडूत पक्षाचे भविष्य काय असेल याची चिंता असल्याचेही ते म्हणाले. लवकरच त्रिंची येथे एका सभेचे आयोजन करून त्याठिकाणी आपल्या नव्या पक्षाचे नाव आणि झेंडा जाहीर करणार असल्याचेही वासन यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नवीन पक्ष सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या नव्या सदस्य नोंदणीच्या कार्डवर कामराज आणि मूपनार या नेत्यांचे फोटो न वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वासन समर्थकांमध्ये मोठी नाराजी होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.