आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy Over MLA Returned Gifts Of Rabri Devi

गिफ्टवरून वाद : सुशील मोदींसह आमदारांनी भेटवस्तू परत केल्याने राबडीदेवी संतप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभेच्या आमदारांना शिक्षण विभागाकडून दिलेल्या महागड्या भेटवस्तूच्या प्रकरणाने आता नवीनच वळण घेतले आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि भाजप आमदारांनी सोमवारी त्यांना दिलेल्या सर्व भेटवस्तू परत केल्या. भाजपच्या या पवित्र्यावर माजी मुख्यमंत्री राबडीदेवी चांगल्याच भडकल्या आहेत. आता भेटवस्तू परत करण्याचे सोंग आणणारे सुशील मोदी यांनी आजपर्यंतच्या भेटवस्तू परत कराव्यात, असे आव्हानच त्यांनी दिले.

भाजपचे आमदार त्यांना मिळालेल्या भेटवस्तू परत करणार असल्याची चर्चा सोमवारी सकाळपासूनच होती. भेटवस्तू परत केल्यानंतर सुशील मोदी म्हणाले की, भाजपच्या आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सर्व भेटवस्तू परत केल्या आहेत. अशाप्रकारे भेटवस्तू देण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. बिहारच्या शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या भेटवस्तूंचे छायाचित्र माध्यमांनी प्रकाशित केले होते. एकीकडे नियोजित शिक्षकांना सहा महिन्यांपासून वेतन न देता अशाप्रकारे भेटवस्तूंवर उधळपट्टी केल्या जात असल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते. त्यामुळे या प्रकरणावर आठवडाभर चर्चा सुरू होती. यातच भाजपचे सुशील मोदी यांनी आतापर्यंतच्या सर्व भेटवस्तू त्यांच्या खोलीबाहेर काढून ठेवल्या आणि ही प्रथा बंद करण्याची विनंती केली.

भाजपचे राजकारण: काँग्रेस
महागड्या भेटवस्तूंच्या प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांवर सुरू असलेल्या आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षण मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्ष या प्रकरणी उगाच राजकारण करत आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मात्र, भाजप त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी भेटवस्त्ूच्या मुद्यावर राजकारण करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भेटवस्तूंची ही प्रथा बंद करण्यास सहमती दाखवली आहे.

राबडीदेवी घरी घेऊन गेल्या भेटवस्तू
माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सर्व भेटवस्तू त्यांच्या कारमधून घरी नेल्या. शिवाय, भेटवस्तू परत करणारे सुशील मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता भेटवस्तू परत करण्याचे सोंग करणाऱ्या मोदींनी त्या आतापर्यंत का स्वीकारल्या? असा सवाल राबडीदेवींनी केला आहे. सुशील मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात अशाप्रकारे बऱ्याच भेटवस्तू घेतल्या आणि वाटल्या आहेत. त्यांना परतच करायचे असेल तर ८ वर्षांतील सर्वच वस्तू परत कराव्यात. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राबडीदेवी यांच्या सुरात सूर मिळवत परत करायचे असते तर भेटवस्तू स्वीकारल्या कशाला, असा प्रश्न विचारला.