रायपूर - छत्तीसगडमधीलबस्तर जिल्ह्यात धर्मांतर केलेल्या ३९ ख्रिश्चन नागरिकांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केले असल्याचा दावा भाजपच्या एका खासदाराने रविवारी केला. विशेष म्हणजे देशात धर्मांतरावरून वाद सुरू असताना हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलातर्फे बस्तर जिल्ह्यातील मदहोटा गावात हा धर्मांतराचा कार्यक्रम घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या कार्यक्रमात हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या ३९ आदिवासींनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होतो, असे बस्तरचे खासदार दिनेश कश्यप यांनी सांगितले. आदिवासींना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. बस्तर जिल्ह्यातील ख्रिश्चन मिशनरीज मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी काम करत आहे. आदिवासी नागरिकांनी विहिंपने आम्ही पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आल्याचे, पोलिस अधिक्षक अजय यादव यांनी म्हटले आहे.