रायपूर - देशभरातील रंगकर्मी व नाटककारांसाठी एक चांगली वार्ता आहे. थिएटरला प्रमोट करण्यासाठी तसेच नाटकांच्या कथांचा तुटवडा दूर कण्यासाठी छत्तीसगडमधील एका संस्थेने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी चक्क स्क्रिप्ट बँक तयार केली आहे. यात आजघडीला ११ पेक्षा जास्त नाटकांच्या स्क्रिप्ट आहेत. या स्क्रिप्ट नाट्यकर्मी व लोकांना नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जात आहेत, हे विशेष. अमेरिका व कॅनडातील लोकांनी आतापर्यंत या बँकेकडे स्क्रिप्टची मागणी केली आहे. देशातील ही अशा स्वरूपाची पहिलीच व सर्वात मोठी स्क्रिप्ट बँक आहे.
विजय तेंडुलकर, कर्नाडांची कथा
या स्क्रिप्ट बँकेत सध्या विजय तेंडुलकरांसह हबीब तन्वीर, मृणाल पांडे, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, धर्मवीर भारती, रामगोपाल बजाज, डॉ. शंकर शेष आदींच्या पटकथा ठेवण्यात आल्या आहेत
रंगकर्मींना मोफत स्क्रिप्ट उपलब्ध
नाट्यचळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्वात मोठी अडचण ही स्क्रिप्टची असते. ती दूर करण्यासाठी या स्क्रिप्ट बँकेची सुरुवात करण्यात आली आहे. सुतनुका सोसायटी आॅफ परफॉर्मिंग आर्ट््सने २०१४ मध्ये स्क्रिप्ट बँकेची सुरुवात केली. सुरुवातीला बँकेत ५१२ स्क्रिप्ट जमा होत्या. त्यानंतर त्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. आज या बँकेत ११२० स्क्रिप्ट जमा झाल्या आहेत व त्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. संस्थेचे संचालक रवींद्र गोयल यांनी या स्क्रिप्ट रंगकर्मी व नाट्यप्रेमी, तसेच लेखकांकडून मिळवल्या आहेत. नाटक सादरीकरण करण्याआधी नाटककारांकडून त्यासंदर्भात परवानगी घेणे बंधनकारक असेल या अटीवरच स्क्रिप्ट दिली जाते. संबंधितांकडून केवळ स्क्रिप्ट पेजेसच्या फोटोकॉपी व कुरिअरचाच खर्च घेतला जातो. अातापर्यंत देशातील विविध शहरांमधून नाट्यप्रेमींनी या संस्थेकडे संपर्क साधून नाट्यसंहितांची मागणी केली आहे. sutanukaperformin garts. blogspot.in/ या लिंकवर भेट देऊन स्क्रिप्टची मागणी करता येते. त्यासाठी अर्ज भरून द्यावा लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रिप्ट बँकेसाठी स्क्रिप्ट पाठवतादेखील येऊ शकते.