आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Country's Very Powerfull Rocket Launched, GSLV Mark 3

देशाच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण, जीएसएलव्ही मार्क-३ अवकाशात झेपावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरिकोटा/ नवी दिल्ली - मंगळ अभियानाच्या यशाच्या ८४ दिवसांनंतर भारताने एकाच दिवसात अंतराळातील दुहेरी यश संपादन केले. गुरुवारी भारताने सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक शक्तिशाली अशा जीएसएलव्ही मार्क-३ या रॉकेटचे प्रक्षेपण केले. सोबतच मानवाला अंतराळात नेऊ शकणा-या कॅप्सूलचीही यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे आता भारताने अंतराळात मानवरहित अभियानाकडे आगेकूच केली आहे.

आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामधून सकाळी साडेनऊ वाजता या ६.३० लाख किलो वजनाच्या रॉकेटने उड्डाण घेतली. त्यासोबत सुमारे चार टन वजनाचे कॅप्सूल केयरही (क्रू मॉड्यूल अ‍ॅटमॉस्फियर रिएंट्री एक्सपेरिमेंट) होते. प्रक्षेपणाच्या ५.४ मिनिटांनंतर जमीनीपासून १२६ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यानंतर हे रॉकेट वेगळे झाले आणि त्याने पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. याचे मॉड्यूल पोर्टब्लेअरहून ६०० किलोमीटर दूर अंतरावरील बंगालच्या खाडीत कोसळले. त्याला पुढील संशोधनासाठी श्रीहरिकोटा आणि केरळस्थित विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात पाठवले जाईल. या यशामुळे भारत अंतराळात वजनदार उपग्रह पाठवणा-या देशांच्या यादीत पोहोचला आहे.
स्वावलंबी बनलो
संपूर्ण देशी बनावटीचे हे रॉकेट फक्त १४० कोटी आणि कॅप्सूल १५ कोटी रुपयांत बनवण्यात आले आहे. परदेशी अंतराळ संस्थांच्या तुलनेत हा निम्मा खर्च आहे. चार टन वजनाचे उपग्रह पाठवण्यास भारत सक्षम बनल्याने आता दुस-या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. ३.५ टन वजनाच्या उपग्रहासाठी ५०० कोटींची लाँचिंग फीस द्यावी लागते.

पहिले पाऊल
आपल्या बळावर अंतराळात मानव पाठवू शकणारा भारत आता जगातील चौथा देश ठरेल. यापूर्वी फक्त रशिया, चीन आणि अमेरिकेनेच हा गौरव प्राप्त केला आहे. भारताला यासाठी अजून १० वर्षे लागतील.

कमाईत होईल वाढ
वजनदार व्यावसायिक उपग्रह लाँच करण्यासाठी आता अन्य देश भारताची मदत घेतील. या क्षेत्राची सुमारे १.९० लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) ची उलाढाल आहे. भारताने २०१२-१३ काळात व्यावसायिक उपग्रहांच्या माध्यमातून १३०० कोटींची कमाई केली.

वैज्ञानिकांची गुणवत्ता व मेहनतीचे फळ : मोदी
या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. जीएसएलव्ही मार्क-३ चे परीक्षण आमच्या वैज्ञानिकांची गुणवत्ता आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि लोकसभेतील सदस्यांनीही वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.