आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Direct\'s To File Case Against Raut And Owaisi

राऊत, ओवेसी यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश; आयपीएस अधिकारी न्यायालयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याची मागणी करणारे शिवसेना खासदार संजय राऊत व एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश लखनऊतील न्यायालयाने दिले आहेत.
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी सीआरपीसीच्या कलम २०० अन्वये राऊत आणि ओवेसींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील कुमार यांनी हे निर्देश दिले आहेत. राऊत यांच्याविरुद्ध कलम १५३ (अ) (जात, धर्म, पंथ, जन्म वा निवासाचे ठिकाण इत्यादींच्या आधारे जातीय विद्वेष निर्माण करणे), कलम २९५ (अ) (हेतुत: विशिष्ट समुदायाचा अपमान करणे) आणि कलम २९८ (धार्मिक भावना दुखावणे) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या लेखामध्ये उद‌्धृत ओवेसींची विधानेही याच कलमांमध्ये बसणारी असून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नक्वी व हेपतुल्लांचा मताधिकार काढून दाखवा : ओवेसींचे आव्हान
हैदराबाद | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी जोरदार पलटवार केला आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची कोणाचीही हिंमत नाही. शिवसेना केंद्रात व महाराष्ट्रात बरोबरीने सत्तेत असल्यामुळे भाजप त्यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकत नाही. राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि नजमा हेपतुल्ला यांचा मताधिकार काढूनच दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

खा. राऊतांविरोधात औरंगाबादेतही तक्रार
औरंगाबाद | संजय राऊत आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे मुस्लिम व ख्रिश्चनांची नसबंदी करा म्हणणाऱ्या साध्वी देवा ठाकरे यांच्याविरूद्ध सिटी चौक पोलिसांत तक्रार दाखल झाली.दोघांविरोधात भादंवि १८६० चे कलम १५१,१५३ (अ, ब व क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद खान यांनी केलीे. युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मसरूर खान यांनीही खा. राऊतांवर औरंगाबादेत येण्यास बंदी घालावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

भाजपने अंग झटकले
केंद्र सरकार व भाजपने राऊत यांच्या वादग्रस्त विधानाबाबत अंग झटकले. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, राज्यघटना सर्व नागरिकांना समान मताधिकार देते. त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. कोणाचा मताधिकार काढून घेणे तर दूरच, पण त्याबाबत चर्चाही अस्वीकारार्ह आहे. अन्य लोक जसे या देशाचे नागरिक आहेत, तेवढेच मुस्लिमही अाहेत.

कुटुंब नियोजन नाही, तर मताधिकार नाही
उन्नाव | कुटुंब नियोजन न करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेतला पाहिजे, अशी वादग्रस्त मागणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे.कुटुंब नियोजन हा भारत सरकारचा उपक्रम आहे. सर्वांसाठी कुटुंब नियोजन सक्तीचे करणारा कायदा झाला पाहिजे. तुष्टीकरणाने देश बरबाद झाला आहे. आता देशात मोदी युग असल्याने ते चालणार नाही. हिंदू मंदिरांवर कर लावता तर अन्य लोकांना धार्मिक यात्रेसाठी सवलत दिली जाते, असे ते म्हणाले.