आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तूरच्या महापौरांची भरदिवसा हत्या, महापौरांचे पतीही गोळीबारात जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तूर- आंध्र प्रदेशातील चित्तूर शहराच्या महापौर कटारी अनुराधा यांची मंगळवारी दुपारी हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी आधी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. नंतर गोळीबार केला. या हल्ल्यात अनुराधा यांचा जागीच मृत्यू झाला. चित्तूर हा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गृह जिल्हा आहे. अनुराधा (५०) याही सत्ताधारी तेलगू देशम पक्षाच्या सदस्य होत्या.
पोलिसांच्या माहितानुसार, घटना चित्तूर महापालिका कार्यालयात घडली. पाच-सहा बुरखाधारी हल्लेखोरांनी अनुराधा यांच्या चेम्बरमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते फरार झाले. हल्ल्यात अनुराधा यांचे पती कटारी मोहन यांनाही गोळी लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हत्येमागे बंगळुरूच्या सुपारी किलर्सचा हात असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

आंध्रचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. पी. ठाकूर यांनी सांगितले की, अनुराधा आणि त्यांच्या पतीचा कुटुबीयांशी संपत्तीवरून वाद होता. माजी आमदार सी. के. बाबू यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणात अनुराधा यांचे पती कटारी मोहन हेही आरोपी आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलिस तपास करत आहेत. लवकरच सत्य उजेडात येईल आणि आरोपींना अटक केली जाईल.