पाटणा- सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेल्या बिहारच्या तीन न्यायाधीशांना पाटणा उच्च न्यायालयाने ‘फुल कोर्ट मीटिंग’मध्ये बडतर्फ केले. हरिनिवास गुप्ता, जितेंद्रनाथ सिंह आणि कोमल राम अशी त्यांची नावे आहेत.
गुप्ता समस्तीपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तर सध्या मुजफ्फरनगरमध्ये कार्यरत होते. जितेंद्र नाथ हे आरा जिल्हा न्यायालयात अपर सत्र न्यायाधीश, तर कोमल राम हे नवादामध्ये उपन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. हे तिन्ही न्यायिक अधिकारी 26 जानेवारीला झेंडावंदन करून नेपाळच्या विराटनगरमध्ये गेले होते. तेथील मेट्रो गेस्टमध्ये ते थांबले होते. त्या रात्री नेपाळच्या पोलिसांनी त्या गेस्ट हाऊसवर धाड टाकली तेव्हा हे तिघेही युवतींसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. न्यायिक सेवेत कार्यरत असल्यामुळे नेपाळच्या पोलिस अधीक्षकांनी त्यांची सुटका करून टाकली होती, परंतु नेपाळमधून प्रकाशित होणा-या ‘उद्घोष’ या वर्तमानपत्राने 29 जानेवारीला याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच न्यायाधीशांचे कृत्य उघडकीस आले. सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याची माहिती मिळताच बिहार न्याय विभागाने तिघांना पदच्चूत केले आणि न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे.
बिहारमधील पूर्णियाचे जिल्हा न्यायाधीश संजयकुमार यांनी या प्रकरणाची चौकशी केली. कोमल राम वगळता अन्य दोघांनी हे प्रकरण मान्य केले आहे. प्रकरण देशाबाहेर घडल्यामुळे याची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचली. याप्रकरणी गृह मंत्रालयाच्या उपसचिवांनी पाटणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला चिठ्ठी लिहून मुख्य न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.