आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Curfew In Kishtwar District Of Jammu And Kashmir After Clashes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - किश्तवाड दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात जम्मू-काश्मिर सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याने तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज (सोमवार) संसदेत केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीही ही मागणी उचलून धरली. दरम्यान, जम्मू-काश्मिरच्या गृहराज्यमंत्र्याने राजीनामा दिला आहे.

मायावती म्हणाल्या, की किश्तवाड जिल्ह्यात दंगल उसळली तेव्हा जम्मू-काश्मिरचे गृहराज्यमंत्री तेथे होते. परंतु, त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. तेथील लोकांना अत्यंत क्रुरपणे ठार मारण्यात आले आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. किश्तवाड दंगलीची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आमची मागणी आहे.

यापूर्वी बोलताना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले, की किश्तवाड दंगलीत जम्मू-काश्मिर सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता आहे. दंगलग्रस्तांना मदतीची गरज असताना तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोईस्कर डोळेझाक केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या दंगलीच शेकडो दुकाने, घरे यांना आग लागण्यात आली. अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याची गरज आहे. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. दंगल पीडितांना आवश्यक मदत मिळायला हवी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

आतापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक का झाली नाही? असा सवालही जेटली यांनी विचारला आहे.

किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या जातीय दंगलीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमधील कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

लोकसभा आणि राज्यसभा येथील कामकाज सुरू झाल्यानंतर किश्तवाड दंगलीवरून भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. अरुण जेटली यांना दंगलग्रस्त भागात का जाऊ दिले नाही आणि जम्मू-काश्मिर सरकार सत्य का लपवित आहे, असा आरोप करीत भाजपचे खासदार सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत जमा झाले होते. दरम्यान, ईदच्या दिवशी झालेल्या या जातीय दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिला आहे.

किश्तवाड जिल्ह्यातील जातीय दंगलीनंतर प्रदेशातील दहा जिल्ह्यांत रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली. लष्कराने फ्लॅग मार्च केला. दुसरीकडे राजकीय पुढार्‍यांना प्रदेशात येण्यास मज्जाव करण्यात आला. भाजप नेते अरुण जेटली यांना सीमा ओलांडून प्रवेशदेखील करू देण्यात आला नाही. त्याअगोदरच जेटली यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना विमानतळावर रोखण्यात आले.जम्मूपासून 226 किलोमीटर अंतरावर दंगलीतील आणखी एक मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडण्याची ही शुक्रवारनंतरची सलग तिसरी वेळ आहे. त्याअगोदर दोन व्यक्तींचे मृतदेह सापडले होते तर काही जखमी झाले होते.

(किश्तवाडमधील जातीय दंगल देशविरोधी कट- मोदी )