आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीवरून गदारोळ सुरूच; संसदेच्या दोन्ही सभागृहांचा चौथा दिवसही वाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचा आजचा दिवसही वाया गेला. नोटबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे, या आधीच्या मागणीसोबतच आता विरोधकांनी नवी मागणी केली आहे. नोटबंदीच्या समस्येमुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी नवी मागणी विरोधकांनी मंगळवारी लावून धरली.

लोकसभेत सरकारवर हल्ला करणाऱ्या विरोधकांना मंगळवारी अण्णा द्रमुकची साथ मिळाली. मतदान अनिवार्य असलेल्या नियमाखाली नोटबंदीच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि पंतप्रधानांनी उपस्थित राहावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.राज्यसभेतही एकत्रित आलेल्या विरोधकांनी पंतप्रधान सभागृहात आल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, ही भूमिका लावून धरली. नोटबंदीनंतर उद्भवलेल्या समस्येनंतर ७० जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणीही केली.
शिसोदिया, मिश्रा यांना घेतले ताब्यात
केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मंगळवारी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया आणि कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा मार्च सुरू करण्याआधी जंतरमंतर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिसोदिया म्हणाले की, ‘मोदी सामान्य नागरिकांना रडवत असून नक्राश्रू ढाळत आहेत. राजकीय जीवनात मोदी जे करत आहे ते आम्हाला पसंत नाही. ही नोटबंदी नव्हे तर नोट-बदली आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे आज २ हजारांची नवी नोट आढळली. दहशतवाद्यांकडे ही नोट कुठून आली? एकतर तुम्हाला त्याबद्दलची माहिती नाही किंवा मग तुम्हीच त्यात सहभागी आहात.
बातम्या आणखी आहेत...