आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशांत आंध्र प्रदेशात आता चक्रीवादळाचे संकट आ वासून उभे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद, नवी दिल्ली - तेलंगणाच्या निर्मितीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनामुळे सीमांध्र प्रदेशातील वीजपुरवठा चौथ्या दिवशीही विस्कळीतच होता. राज्य सरकारी कर्मचारी आणि आंध्र सरकार दरम्यानच्या वाटाघाटी फिसकटल्या आहेत. आधीच आंदोलने, संपामुळे बेहाल असलेल्या आंध्र प्रदेशसमोर आता चक्रीवादळाच्या रुपाने नैसर्गिक संकट आ वासून उभे राहिले आहे. दरम्यान, जनआंदोलन शांत होण्याची चिन्हे नसल्याने सीमांध्र भागात इस्मा कायदा लादण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.


आंध्र किनारपट्टी व रायलसीमा भागातील वीज कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने जवळपास संपूर्ण राज्य अंधारात आहे.संपाची कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने तेलंगणा मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी बोलावली आहे. तेलंगणा निर्मीतीच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील सर्व यंत्रणाच ठप्प झाली असून वातावरण निवळण्यासाठी केंद्र सरकार सीमांध्र भागात जीवनावश्यक वस्तू कायदा (ईस्मा) लागू करण्याच्या विचारात आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे, वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिक बेहाल झाले असून नवरात्रीनिमित्त सीमांध्र व रायलसीमा भागाकडे निघणा-या मोजक्या गाड्यांमध्ये खच्चून गर्दी होत आहे. तेलंगणा निर्मीतीच्या निर्णयावर केंद्र सरकार ठाम असून या निर्णयावरुन सरकार मागे हटणार नाही असे काँग्रेसने स्पष्ट केले. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे.


ये उनका मामला, हमे क्या करना है
दिल्लीतील आंध्र भवन येथे उपोषणास बसलेल्या चंद्राबाबू नायडू यांना आंध्र सरकारने जागा सोडण्यास सांगितले आहे. मात्र चंद्राबाबूंचे बेमुदत उपोषण सुरूच असून आंध्र सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयास हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या वादात पडण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. ये उनका मामला है, हमे क्या करना है, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी हात झटकले.


मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत तुकडे होऊ देणार नाही : किरणकुमार रेड्डी
मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत राज्याचे तुकडे होऊ देणार नाही अशी हमी बुधवारी किरणकुमार रेड्डी यांनी बिगर राजपत्रित राज्य सरकारी कर्मचा-यांना दिली. मात्र सीमांध्र भागातील कर्मचारी संघटना व सरकारमधील बोलणी फिसकटली. हैदराबादच्या सचिवालयात सुमारे तीन तास ही बोलणी सुरु होती. वादळाचे संकट पाहून तरी संप मागे घ्या, अशी विनंती रेड्डी यांनी केली होती, परंतु कोंडी फुटू शकली नाही.


ताशी 175 कि.मी. वेग
आंध्र प्रदेशातील उत्तर भाग आणि ओडिशा किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आंध्रातील कलींगपटणम आणि पारदीप किनारपट्टीवर 12 ऑ क्टोबरपर्यंत हे वादळ धडकू शकते. त्याचा वेग सुमारे ताशी 175 ते 185 किलोमीटर आहे.